सॅटर्डे क्लबच्या कार्यशाळेत रंगली उद्योग-व्यवसाय विकासाची चर्चा

रत्नागिरी : मराठी माणूस उद्योग-व्यापारात मागे असतो, ही समजूत काळाबरोबर बदलण्यासारखी स्थिती हळूहळू तयार होत आहे. साहित्य, करमणूक आणि सण यासाठी एकत्र येणाऱ्या माणसांप्रमाणेच उद्योग व्यवसायाची चर्चा करण्यासाठी जमणाऱ्या कोकणातील माणसांनी सभागृह भरून जाऊ शकते हे वास्तव रत्नागिरी शहरात पाहायला मिळाले. ‘उद्योजकता हा एकच ध्यास, चला घडवू नवा इतिहास’ हे ब्रीदवाक्य असणाऱ्या ‘सॅटर्डे क्लब’ने रत्नागिरीत उद्योग मार्गदर्शन कार्यशाळेत हे सारे लोक जमले होते, नव्या आणि विस्तारित होत असलेल्या उद्योगांना मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञांची व्याख्याने, यशस्वी उद्योजकांची मुलाखत आणि निवडक उत्पादनांचे छोटेखानी प्रदर्शन यांनी रत्नागिरी शहराच्या मध्यवर्ती भागातील व्यंकटेश हॉटेलचे सभागृह अनेक तास गजबजून गेले.

‘सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट’तर्फे ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ‘सॅटर्डे क्लब’च्या रत्नागिरी शाखेच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला उद्योग सुरू करण्यास इच्छुक असणाऱ्या व्यक्तींचीही उपस्थिती होती. सशुल्क मार्गदर्शन कार्यक्रम असूनही रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतून कार्यशाळेला भरघोस प्रतिसाद मिळाला.

जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक डॉ. विद्या कुलकर्णी यांनी या कार्यशाळेत शासनाच्या उद्योगविषयक योजनांची माहिती दिली. नवीन उद्योग सुरू करणे, उद्योगाचा विस्तार करणे, यासाठी शासनातर्फे केले जाणारे सहकार्य, सब्सिडी आणि वित्तसहाय्य योजना यांची माहिती त्यांनी दिली. उद्योगांची नोंदणी ‘सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विभागा’च्या (MSME) संकेतस्थळावरून विनाशुल्क करता येते हे त्यांनी सांगितले.

कार्यशाळेला निमंत्रित पाहुणे म्हणून उपस्थित असलेले सेवायोजन अधिकारी गणेश बिटोरे यांनी शासनाच्या कौशल्य विकास विभागाच्या कामाची माहिती दिली. उद्योगांच्या गरजा लक्षात घेऊन प्रशिक्षित मनुष्यबळ पुरवठा विनामूल्य उपलब्ध करून दिला जातो, असे त्यांनी सांगितले. कौशल्य विकास विभागाच्या संकेतस्थळावर यासंबंधी आवश्यक ती माहिती, कुशल मनुष्यबळाची यादी उपलब्ध आहे. उद्योजकांना याकरिता निःशुल्क नोंदणी करता येते. या विभागातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या रोजगार मेळाव्याला उपस्थित राहूनही उद्योजकांना आपल्याला आवश्यक ते मनुष्यबळ मिळविण्यासाठी प्रयत्न करता येतो. उमेदवारांना प्रशिक्षण देण्यासाठी उद्योजकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

उद्योग करण्याची आकांक्षा मनात रुजण्याचे वातावरण महाराष्ट्रात तयार व्हावे या कल्पनेतून माधवराव भिडे यांनी ‘सॅटर्डे क्लब’ स्थापन केला. या उद्योजकांच्या संघटनेच्या माध्यमातून उद्योग स्थापन करण्याची प्रेरणा निर्माण करण्यासाठी डॉ. अजित मराठे यांचे उद्बोधक व्याख्यान झाले. उद्योगांना आवश्यक शिक्षण, ऊर्जा, अनुभव, व्यावसायिक जाळे (नेटवर्क) अशा आठ पायाभूत गोष्टींची माहिती त्यांनी दिली. रत्नागिरी जिल्ह्यातील उद्योजकांनी अवघ्या चार वर्षांत या संघटनेच्या शाखेच्या माध्यमातून केलेल्या कामाची प्रशंसा त्यांनी केली.

क्लबची स्थापना, स्वतःच्या व्यवसायाची प्रगती आणि उद्योगातून साध्य केलेल्या जनहिताबद्दल सर्वश्री प्रतीक कळंबटे (वृक्षवल्ली नर्सरी), तुषार आग्रे (स्वराज्य ऍग्रो) यांचा सत्कार करण्यात आला. ‘रायझिंग आंत्रप्रेन्युअर’ म्हणून संदीप राघव यांना तर प्रतीक कळंबटे (संस्कृती फूडफार्म) आणि कांचन चांदोरकर यांना ‘यंग अचीव्हर्स’ म्हणून गौरविण्यात आले. ‘कोकण मीडिया’चे संपादक प्रमोद कोनकर यांना राज्यपालांच्या हस्ते पत्रकारितेमधील राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल ‘क्लब’तर्फे विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला.

देशभर शेकडो रुग्णालयांची उभारणी करणारे इन्फिगो आय केअर हॉस्पिटलचे डॉ. श्रीधर ठाकूर यांची प्रमोद कोनकर यांनी घेतलेली विशेष मुलाखत हे या कार्यशाळेचे ठळक आकर्षण ठरले. प्रतिकूल परिस्थितीशी मुकाबला करून डॉक्टर बनल्यावर वैद्यकीय सेवा देताना डॉ. ठाकूर यांनी या क्षेत्रातील सेवा आणि व्यवस्था यांत सुधारणा करण्यासाठी तसेच कर्मचाऱ्यांमध्ये कार्यसंस्कृती रुजविण्यासाठी केलेले प्रयत्न आणि व्यावसायिकतेबरोबरच समाजहिताची दृष्टी याबद्दल त्यांच्याशी झालेल्या वार्तालापातून प्रेरणादायी संवाद श्रोत्यांना ऐकण्यास मिळाले. (या मुलाखतीच्या व्हिडिओची लिंक बातमीच्या शेवटी दिली आहे.)

चॅप्टरचे चेअरपर्सन तुषार आग्रे, सेक्रेटरी प्रतीक कळंबटे आणि ट्रेझरर सागर वायंगणकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रमाचे उत्तम आयोजन केले.

‘सॅटर्डे क्लब’च्या कोकण विभागाचे समन्वयक राम कोळवणकर यांनी आभार मानले. सौ. कांचन चांदोरकर यांनी सूत्रसंचालन केले.

– राजेंद्रप्रसाद मसुरकर

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply