गझलकार मधुसूदन नानिवडेकरांच्या प्रथम स्मृतिदिनी आचऱ्यात ‘कोमसाप-मालवण’तर्फे ‘मधुरांजली’

आचरे : प्रसिद्ध गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांचा पहिला स्मृतिदिन ११ जुलै २०२२ रोजी आहे. त्याच्या पूर्वसंध्येला आचरे (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथे ‘मधुरांजली’ या साहित्यिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. रविवारी, १० जुलै २०२२ रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत हा कार्यक्रम बागजामडूल-आचरे येथील जामडूल रिसॉर्टमध्ये होणार आहे.

रुजारिओ पिंटो (केंद्रीय सल्लागार, कोमसाप) हे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी असतील. जेरोन फर्नांडिस (जि. प. सदस्य, आचरे मतदारसंघ) हे उद्घाटक असतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामचंद्र आंगणे (उपशिक्षणाधिकारी, जि. प. सिंधुदुर्ग) असतील. हा कार्यक्रम आषाढी एकादशी होत असल्याने ‘अक्षरांची एकादशी’ हा ‘कोमसाप-मालवण’च्या ११ कवींच्या स्वरचित कवितांच्या सादरीकरणाचा कार्यक्रमही होणार आहे. यात मधुरा माणगावकर, अदिती मसुरकर, मंदार सांबारी, सुप्रिया सकपाळ, विजयकुमार शिंदे, सुगंधा गुरव, सदानंद कांबळी, दौलतराव राणे, सुरेंद्र सकपाळ, ऋतुजा केळकर आणि मालवणी कवी रुजारिओ पिंटो यांच्या काव्यवाचनाचा समावेश असेल.

नानिवडेकर यांच्या ‘चांदणे नदीपात्रात’ या काव्यसंग्रहातील काही निवडक कवितांचे वाचन रामचंद्र कुबल आणि उज्ज्वला धानजी करणार आहेत. आचरे-बागजामडूल रिसॉर्ट हे मधुसूदन नानिवडेकर यांचे आवडते विसाव्याचे एकमेव ठिकाण होते. म्हणूनच प्रथम स्मृतिदिन त्याच ठिकाणी साजरा करावयाचे ठरवण्यात आले. या अक्षरसोहळ्याला साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ‘कोमसाप-मालवण’चे अध्यक्ष सुरेश श्यामराव ठाकूर यांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply