आषाढीनिमित्त वालावल येथे अभंग, भावगीत, भक्तिगीतांचा कार्यक्रम

वालावल (ता. कुडाळ) : कोकणातील प्रतिपंढरपूर मानल्या जाणाऱ्या वालावल (ता. कुडाळ) येथील श्री देव लक्ष्मीनारायण मंदिरात आषाढीनिमित्ताने रविवारी (दि. १० जुलै) अभंग, भावगीत, भक्तिगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

मंदिरातील आषाढी एकादशी उत्सव सकाळी ८ वाजल्यापासून धार्मिक कार्यक्रमांनी सुरू होईल. सकाळी अभिषेक आणि लघुरुद्र होईल. सायंकाळी ४ वाजता कीर्तन होईल. कोल्हापूर येथील देवस्थान व्यवस्थापन समिती आणि वालावल येथील श्री देव लक्ष्मीनारायण स्थानिक सल्लागार उपसमितीने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. सायंकाळी साडेसात वाजता स्वरसिंधुरत्न पुरस्कार विजेत्या स्पर्धकांच्या गायनाचा कार्यक्रम होईल.

अशोक प्रभू

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. अशोक वासुदेव प्रभू यांनी कोकणातील उदयोन्मुख कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने स्वरसिंधुरत्न स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेची आणि त्यांची आठवण म्हणून त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनी १३ मे रोजी जिल्हास्तरीय हिंदुस्थानी शास्त्रीय गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत ११ ते १६ वर्षे वयाच्या शालेय गटात ऋचा संजय पिळणकर, १७ ते ३५ वर्षे वयाच्या युवा गटात देवयानी यशवंत केसरकर आणि ३५ वर्षांवरील खुल्या गटात मनोज भालचंद्र मेस्त्री यांनी प्रथम क्रमांक पटकावले. पहिल्या गटात भाविक गजानन मेस्त्री आणि श्रुती शरद सावंत यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळविला. दुसऱ्या गटात विधिता वैभव केंकरे आणि हर्षल सगुण मेस्त्री यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळविला. हे विजेते कलाकार अभंग, भावगीत आणि भक्तिगीते सादर करतील. त्यानंतर रात्री ९.३० वाजता स्वरसिंधुरत्न पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.

अधिक माहितीससाठी डॉ. प्रणव प्रभू (९४२१०७३९०७) किंवा गुरू देसाई (९५४५१००९३०) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply