रत्नागिरी : मुसळधार पाऊस पडत असल्याने दरडी कोसळण्याचा धोका असल्याने मुंबई-गोवा महामार्गावरचा चिपळूणमधला परशुराम घाट आता १२ जुलैच्या मध्यरात्री २४ वाजेपर्यंत म्हणजेच १३ जुलैपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी तसे आदेश आज (९ जुलै) काढले आहेत. आधीच्या आदेशानुसार हा घाट ९ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत बंद ठेवण्यात येणार होता; मात्र जिल्ह्यात १२ जुलैपर्यंत मुसळधार पाऊस कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे सुधारित आदेशानुसार बंदी कालावधी आणखी तीन दिवसांनी वाढवण्यात आला आहे.
या बंदीच्या कालावधीत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरच्या परशुराम घाटातून सर्व प्रकारची वाहतूक पूर्ण वेळ बंद राहील, असे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात म्हटले आहे. या कालावधीत हलक्या वाहनांच्या एकेरी वाहतुकीसाठी दोन मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.
चिपळूणकडून खेडकडे येणाऱ्या हलक्या वाहनांसाठी कळंबस्ते-आंबडस-शेल्डी-आवाशी हा मार्ग निश्चित करण्यात आला आहे.
खेडकडून चिपळूणकडे जाणाऱ्या वाहनांसाठी पीरलोटे-चिरणी-आंबडस फाटा-कळंबस्ते फाटा हा मार्ग निश्चित करण्यात आला आहे.
गेले काही दिवस रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने मुसळधार पाऊस सुरू असल्याने अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या असून, नद्यांना पूर आले आहेत. परशुराम घाटामध्ये दोन जुलैला रात्री दरड कोसळल्यामुळे घाट रस्ता बंद झाला होता. त्या वेळी तातडीने दरड बाजूला करून पहाटे साडेतीन वाजता वाहतूक सुरू करण्यात आली होती; मात्र त्यानंतरही पाऊस सुरूच होता. त्यामुळे पाच जुलै रोजी पुन्हा एकदा दरड खाली येऊन परशुराम घाटातली वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती. त्यामुळे ती १० जुलैपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. अति पावसामुळे दरडी कोसळून जीवित हानी होऊ नये, यासाठी परशुराम घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात यावा, असा अहवाल कार्यकारी अभियंत्यांनी (राष्ट्रीय महामार्ग विभाग पेण व रत्नागिरी) रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता.
(सोबतच्या चित्रात दर्शवलेला पर्यायी मार्ग आता हलक्या वाहनांना खेडकडून चिपळूणकडे जाण्यासाठी एकेरी वाहतुकीसाठी निश्चित करण्यात आला आहे.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड