आषाढी एकादशीनिमित्त रत्नागिरीत चित्पावन संघातर्फे अभंगवाणी

रत्नागिरी : रत्नागिरीच्या अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहायक मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे खास आषाढी एकादशीनिमित्त अभंगवाणी हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रविवारी, १० जुलै रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत मंडळाच्या जोशी पाळंद येथील ल. वि. केळकर वसतिगृहातील भगवान परशुराम सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमात रत्नागिरी, गुहागर व चिपळूण येथील कलाकार सहभागी होणार असून, प्रसिद्ध कलाकारांबरोबर नव्या उमेदीच्या गायिकासुद्धा यामध्ये आपली कला सादर करणार आहेत. या नव्या उमेदीच्या कलाकारांना चिपळूण येथील प्रसिद्ध गायक व मार्गदर्शक राजाभाऊ शेंबेकर यांनी मार्गदर्शन केले आहे. आषाढी एकादशी अभंगवाणी कार्यक्रमाचे हे आठवे वर्ष असून, दर वर्षीप्रमाणे रत्नागिरीतील सप्तसूर म्युझिकल्स या संस्थेने संगीत संयोजन केले आहे. या कार्यक्रमात चिपळूण येथील प्रसिद्ध गायिका स्मिता करंदीकर यांचा सहभाग आहे. स्मिता करंदीकर यांनी आजपर्यंत खल्वायन या संस्थेच्या संगीत नाटकांमधून अनेक गायक अभिनेत्रींच्या भूमिका करून राज्य नाट्य स्पर्धेत गायनाची रौप्यपदके पटकावली आहेत. त्यांनाही राजाभाऊ शेंबेकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

रत्नागिरीतील प्रसिद्ध युवा कीर्तनकार कैलास खरेही या कार्यक्रमात अभंग सादर करणार असून, डोंबिवलीचे प्रसिद्ध गुरू किरण फाटक यांच्याकडून ते शास्त्रीय गायनाचे मार्गदर्शन घेत आहेत. मधुरा सोमण ही उदयोन्मुख युवा गायिका वडद-गुहागर येथील असून मुग्धा सामंत व सतीश कुंटे या प्रसिद्ध गुरूंकडून तिने काही वर्षं शास्त्रीय संगीताचे मार्गदर्शन घेतले आहे. दुसरी उदयोन्मुख युवा गायिका मुक्ता जोशी हिने नुकत्याच रत्नागिरीत झालेल्या राज्य नाट्य स्पर्धेत ‘संगीत ययाती आणि देवयानी’ या नाटकातून आपल्या गायनाची व अभिनयाची चुणूक दाखवली होती. तिला प्रेरणा दामले-वझे, स्मिता करंदीकर व विनया परब या प्रसिद्ध गायिका व गुरूंकडून काही काळ मार्गदर्शन मिळाले आहे.

या कार्यक्रमाला रत्नागिरीचे आघाडीचे तबलावादक निखिल रानडे तबलासाथ करणार असून, चिपळूणचे प्रसिद्ध हार्मोनियम वादक अमित ओक हार्मोनियमसाथ करणार आहेत. ‘सप्तसूर’चे सर्वेसर्वा आणि पं. विश्वनाथ कान्हेरे यांचे शिष्य निरंजन गोडबोले ऑर्गनसाथ करणार आहेत. पखवाजसाथ संकेत पाडाळकर, तालवाद्यसाथ प्रा. सुहास सोहनी करणार असून, निवेदन प्रदीप तेंडुलकर करणार आहेत. कार्यक्रमाचे ध्वनिसंयोजन एस. कुमार साउंडचे उदयराज सावंत करणार आहेत.

कार्यक्रम सर्वांसाठी विनाशुल्क असून, सर्व रसिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी, सचिव राजेंद्र पटवर्धन, खजिनदार राधिका वैद्य व पदाधिकारी आणि कार्यकारी मंडळाने केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply