मराठीत अनेक म्हणी आणि वाक्प्रचार आहेत. त्यापैकी न कर्त्याचा वार शनिवार हा एक आहे. कोणत्याही कार्याची सुरुवात शनिवारी करू नये. त्यादिवशी सुरू केलेली कामे वेळेवर पूर्ण होत नाहीत, कार्याला गती प्राप्त होत नाही. कधी कधी तर कामे एवढी रखडतात की ती अर्ध्यातून सोडून द्यावी लागण्याची परिस्थिती ओढवते, असा समज आहे. याला समाजाला संपूर्ण छेद देत नकर्त्याचा नव्हे, तर कर्त्याचा वार शनिवार असा नवा वाक्प्रचार अस्तित्वात आला आहे. सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट या नावाने माधवराव भिडे या द्रष्ट्या मराठी उद्योजकाने ही संस्था स्थापन केली. तिला मुद्दामहून शनिवारचे नाव देण्यात आले. मराठी उद्योजकांनी एकत्र यावे, त्यांचे एक व्यासपीठ असावे, वैचारिक आणि आर्थिक देवाणघेवाण व्हावी, आर्थिक उलाढालीबरोबरच एक उद्योजकीय कुटुंब निर्माण व्हावे आणि एकमेकांना मदत करून सर्वांनीच श्रीमंत व्हावे, अशी सॅटर्डे क्लबची संकल्पना आहे.
उद्योग करणे हे मराठी माणसाचे काम नाही. ते गुजराती किंवा इतर परप्रांतीयांनीच करावे, असाही एक दृढ समज असतो. पण उद्योग आणि व्यापार क्षेत्राकडे डोळसपणाने पाहिले, तर मराठी माणसाचीसुद्धा उद्योगाच्या बाबतीत कशी आणि किती प्रगती होऊ शकते, याचे उदाहरण म्हणून सॅटर्डे क्लबशी जोडल्या गेलेल्या उद्योजकांकडे पाहता येईल. सेवानिवृत्त होईपर्यंत रेल्वेत नोकरी करणारे माधवराव भिडे यांनी वयाच्या सत्तराव्या वर्षी स्वतःचा उद्योग सुरू केला आणि त्यातूनच सॅटर्डे क्लबची कल्पना त्यांना सुचली. बावीस वर्षांपूर्वी रुजलेले हे बीज आता महाराष्ट्रव्यापी झाले आहे. छोट्या छोट्या उद्योगापासून कोट्यवधी रुपयांची उलाढाल असणारे उद्योजक या क्लबशी जोडले गेले आहेत आणि एकमेकांना मदत करत आपला उत्कर्ष साधत आहेत. नोकरी करणारे नव्हे तर नोकरी देणारे व्हा, असा संदेश या क्लबच्या माध्यमातून मिळतो. सहकाराची कास धरली तर कितीतरी प्रगती साधता येते. वैयक्तिक प्रगतीबरोबरच कौटुंबिक आणि सामाजिक प्रगतीही साधली जाऊ शकते, हेच सॅटर्डे क्लबने सिद्ध केले आहे. म्हणूनच शनिवारच्या नावाने सुरू झालेला झालेली ही औद्योगिक चळवळ मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये नव्हे तर छोट्या छोट्या शहरांपर्यंतही पोहोचली आहे.
रत्नागिरीतही चार वर्षांपूर्वी सॅटर्डे क्लबच्या शाखेची स्थापना झाली. त्यातून अनेक छोटे-मोठे उद्योजक जोडले. एकमेकांशी जोडले जातानाच स्वतःची सामाजिक पतही ते उंचावत आहेत. कोकणात अनेक उद्योजक आहेत. ते स्वतःपुरताच विचार करत असतात, पण सहकाराच्या माध्यमातून, सहकार्याच्या भावनेतून ते इतर उद्योजकांशी जोडले गेले, तर एकत्रितरीत्या कितीतरी प्रगती साधली जाऊ शकेल. अनेक कारणांनी कोकणातील अनेक उद्योग आजारी पडले आहेत. कित्येक उद्योग बंद पडले आहेत. काही स्थलांतरित झाले आहेत. राजकीय व्यासपीठांवर या उद्योगांसाठी कितीतरी घोषणा होतात. प्रत्यक्षात कोणतीच ठोस पावले उचलली जात नाहीत. त्यामुळे आजाराच्या गर्तेतून पुन्हा उभे राहिलेले उद्योग क्वचितच पाहायला मिळतील. एक प्रकारचा संकुचितपणा कोकणवासीयांमध्ये असतो, तोही त्याला कारणीभूत असतो. उद्योग सॅटर्डे क्लबशी जोडले गेले, तर तो संकुचितपणा दूर व्हायला मदत होईल. व्यक्तिमत्त्व विकासाकरिता उपयुक्त असलेले प्रशिक्षणही या क्लबमध्ये मिळत असल्याने त्याचासुद्धा कितीतरी मोठा लाभ होऊ शकेल. अडचणीत असलेले उद्योग पुनरुज्जीवित होतील आणि पुन्हा चांगली उभारी घेऊ शकतील. चांगले चाललेले उद्योग प्रगतीची नवी उंची गाठू शकतील. हे करत असतानाच अनेक बेरोजगारांना रोजगारही मिळू शकेल. उद्योजकांच्या या चळवळीत कोकणवासीयांनीही मोठ्या संख्येने सहभागी व्हायला हवे.
- प्रमोद कोनकर
(संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, ८ जुलै २०२२)
(साप्ताहिक कोकण मीडियाचे अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)

साप्ताहिक कोकण मीडिया – ८ जुलै २०२२
मॅग्झटर लिंक : https://bit.ly/3uwyDCF
हा अंक सॅटर्डे क्लब-रत्नागिरी चॅप्टरच्या वर्धापनदिनानिमित्त विशेषांक आहे.
या अंकात काय वाचाल?
अग्रलेख : न-कर्त्याचा नव्हे, कर्त्याचा वार शनिवार https://kokanmedia.in/2022/07/08/skmeditorial8july
मुखपृष्ठकथा : सॅटर्डे क्लब – मराठी उद्योजकांची आश्वासक चळवळ : सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टची स्थापना २००० साली माधवराव भिडे यांनी केली. आता ती मराठी उद्योजकांची आश्वासक चळवळ बनली आहे. सॅटर्डे क्लबच्या रत्नागिरी चॅप्टरचा वर्धापनदिन ८ जुलै रोजी आहे. त्या निमित्ताने, या चळवळीविषयी माहिती देणारा लेख…
प्रवास सॅटर्डे क्लबच्या रत्नागिरी चॅप्टरचा… -: रत्नागिरी चॅप्टरच्या वाटचालीविषयीचा लेख…
रत्नागिरी जिल्ह्यातील विविध प्रकारच्या छोट्या-मोठ्या उद्योजकांची आणि त्यांच्या उद्योगांची ओळख करून देणारे लेख या अंकात आहेत. हापूस कॅनिंगपासून फूड फार्मपर्यंत, रोपवाटिकेपासून टायर उद्योगापर्यंत, वेलनेस-फिटनेसपासून हॉटेलपर्यंत, इलेक्ट्रिकल-मेकॅनिकल उद्योगापासून नारळ उद्योगापर्यंत, मसाले उद्योगापासून व्यवसाय सल्लागारापर्यंत अशा वेगवेगळ्या उद्योगांत कार्यरत असलेल्या उद्योजकांची ओळख यातून होईल.

