पाणीपातळी, वाहतुकीपासून इमर्जन्सी नंबर्सपर्यंत… सारी माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर; राज्यात सर्वप्रथम रत्नागिरीत उपक्रम सुरू

रत्नागिरी : कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय प्रत्येक नागरिकाला जिल्ह्यातील पर्जन्यमान, नद्यांची पाणीपातळी, रस्ते वाहतूक आदी सारी माहिती उपलब्ध करून देण्यासाठी रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट प्रणाली सुरू केली आहे. त्यामुळे अशा प्रकारची ताजी माहिती नागरिकांना अगदी सहज म्हणजे व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज पाठवून क्षणात प्राप्त करता येणार आहे. जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनासाठी केलेला हा तंत्रज्ञानाचा वापर अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या प्रणालीचे उद्घाटन आज (७ जुलै) प्रधान सचिव (उद्योग) तथा रत्नागिरीच्या पालक सचिव विनिता वेद सिंघल यांच्या हस्ते झाले.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात सिंघल यांनी एका बैठकीत अतिवृष्टी आणि आपत्ती व्यवस्थापन याचा आढावा घेतला. त्या वेळी त्यांनी या प्रणालीचे उद्घाटन केले. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुशांत खांडेकर व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

फोन न लागणे अथवा एंगेज असल्यामुळे माहिती प्राप्त होणे अनेकदा शक्य होत नाही. अशा परिस्थितीत हा चॅटबॉट नागरिकांना विविध प्रकारची माहिती थेट मोबाइलवर देणार आहे. या प्रणालीच्या मदतीने नागरिकांना पर्जन्यमान, नद्यांची पाणीपातळी, वेधशाळेतर्फे देण्यात आलेल्या सूचना, जिल्ह्याबाबत देण्यात आलेल्या अन्य विशेष सूचना, आपत्कालीन स्थितीत संपर्क साधण्यासाठीचे क्रमांक, रस्ते व वाहतूक, भरतीच्या वेळा, रत्नागिरी जिल्ह्याचा नकाशा, तसेच वेळोवेळी देण्यात आलेले अन्य महत्त्वाचे संदेश कोणालाही तात्काळ प्राप्त करता येतील.

त्यासाठी 7387492156 हा क्रमांक मोबाइलवर सेव्ह करून घेऊन त्यावर व्हॉट्सअ‍ॅपमध्ये सुरुवातीला Hi असा मेसेज टाकावा लागणार आहे. हा मेसेज टाकल्यानंतर R1 ते R9 असे नऊ पर्याय येतील. ते पर्याय असे – R1. पर्जन्यमान, R2. नदी पाणी पातळी अहवाल, R3. वेधशाळा सूचना, R4. विशेष सूचना, R5. आपत्कालीन संपर्क क्रमांक, R6. रस्ते व वाहतूक, R7. महत्त्वाचे संदेश, R8. भरतीच्या वेळा, R9. रत्नागिरी जिल्हा नकाशा

आपल्याला जी माहिती हवी असेल, तो पर्याय क्रमांक रिप्लाय म्हणून टाइप केल्यानंतर त्या माहितीचे उत्तर तातडीने प्राप्त होईल. म्हणजे, वाहतुकीची माहिती हवी असेल, तर R6 असे लिहून पाठवावे.

रत्नागिरी आपत्ती व्यवस्थापन विभागाची ही स्वयं-माहिती प्रणाली म्हणजे राज्यातला पहिलाच उपक्रम आहे. यात अधिक अचूकता आणि वेळोवेळी अधिक माहिती अपडेट करण्याचे काम नियंत्रण कक्ष करणार आहे. या प्रणालीबाबत विनिता वेद सिंघल यांनी प्रशासनाचे अभिनंदन केले व योग्य आणि विश्वासार्ह संदेश देण्याच्या सूचना केल्या.

या बैठकीत त्यांनी कोविड आणि गणपतीपुळे विकास आराखडा यांचाही आढावा घेतला. गणपतीपुळे विकास आराखड्यातील कामे ३१ डसेंबर २०२३ पूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्‍ट ठेवून नियोजन करा, अशा सूचना त्यांनी या वेळी दिल्या. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रकाशन असलेले ‘पर्यटनरत्न’ हे कॉफी-टेबल बुक जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी पालक सचिवांना दिले. ते पुस्तक माहितीपूर्ण असल्याची प्रतिक्रिया पालक सचिवांनी दिली.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply