रत्नागिरी : मेडिकल, इंजिनीअरिंग, कम्प्युटर अशा रूढ क्षेत्रांमध्ये शिक्षण घेतले आणि आपण शहरी भागात असलो, तरच करिअरमध्ये उंच भरारी घेता येते, असा एक सर्वसाधारण समज आहे; मात्र रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील काटवली या छोट्याशा गावातील सुजित जाधवने या समजाला छेद देणारी उत्तुंग कामगिरी केली आहे. तो संगमेश्वरच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा (आयटीआय) माजी विद्यार्थी असून, त्याची स्पेनमधील एका नामवंत आंतरराष्ट्रीय पॅसेंजर शिप कंपनीत ‘असिस्टंट प्लंबर’ पदावर निवड झाली आहे. त्याच्या या अभूतपूर्व यशामुळे आयटीआय संस्थेसह संपूर्ण संगमेश्वर तालुक्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल झाले आहे. या जागतिक दर्जाच्या पदासाठी सुजितला दरमहा सुमारे एक लाख रुपयांपेक्षा जास्त वेतन मिळणार आहे. एका छोट्याशा गावातून थेट आंतरराष्ट्रीय शिपिंग कंपनीपर्यंत झेप घेणाऱ्या सुजितच्या या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
कौशल्यांना जगभरात मोठी मागणी असून, ‘एआय’ तांत्रिक कौशल्याची जागा घेऊ शकत नाही, हे यावरून दिसून आले आहे. आपल्या या यशाबद्दल आणि आजच्या तरुण पिढीला संदेश देताना सुजित सांगतो, की ‘आजच्या आधुनिक युगात तरुणांनी केवळ पदव्यांमागे न धावता प्रत्यक्ष कौशल्यांवर अधिक लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. भविष्यात फिटिंग, वेल्डिंग, प्लंबिंग, सुतारकाम, इलेक्ट्रिकल आणि यांत्रिक काम यांसारख्या तांत्रिक व व्यावहारिक कौशल्यांना जगभरात प्रचंड मागणी असणार आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता कितीही प्रगत झाली, तरी ती मानवी हातांच्या तांत्रिक कौशल्याची जागा घेऊ शकत नाही.’
‘आजच्या प्रगत युगात टिकून राहण्यासाठी आणि स्वतःची प्रगती साधण्यासाठी तरुणांनी व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या ‘आयटीआय’सारख्या संस्थांमध्ये प्रवेश घेण्यास प्राधान्य दिले पाहिजे. तेथून योग्य कौशल्य आत्मसात करून आपण जागतिक स्तरावर प्रावीण्य मिळवू शकतो,’ असा विश्वास त्याने व्यक्त केला. सुजितच्या या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये कौशल्याधारित शिक्षणाविषयी एक नवा उत्साह निर्माण होण्यास मदत होणार आहे.


