कुपोषित बालकांना पोषक आहार देण्याचा आणि पालकत्व घेण्याचा निर्णय

रत्नागिरी : ‘कुपोषण कमी करण्याच्या प्रयत्नांमध्ये रत्नागिरी जिल्हा परिषद अग्रेसर असून, आगामी काळात विविध उपाययोजनांच्या माध्यमातून हे प्रमाण शून्यावर आणून राज्यामध्ये आदर्श निर्माण केला जाईल,’ असं राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी सांगितलं. जिल्हा परिषदेत आयोजित करण्यात आलेल्या कुपोषित बालकांच्या संदर्भातल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्ह्यातल्या शालेय शिक्षणाचा दर्जा आणि पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी जिल्ह्यात किमान २०० ते २५० नवीन वर्गखोल्यांचं बांधकाम केलं जाणार असून, यासाठी जिल्हा परिषदेला २० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असं पालकमंत्र्यांनी सांगितलं. शाळांच्या पटसंख्येनुसार (विद्यार्थी संख्या) तातडीने आराखडा तयार करावा आणि ज्या शाळांच्या इमारतींना दुरुस्तीची अत्यंत गरज आहे, त्यांचं प्राधान्यक्रमाने नियोजन करून कामं सुरू करावीत, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी शिक्षण विभागाला दिले.

सध्या कुपोषणाचं प्रमाण कमी असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत तीव्र कमी वजनाची ३४, तर मध्यम कमी वजनाची ६३२ बालकं आहेत. ही मध्यम वजनाची बालकं तीव्र कुपोषणाच्या श्रेणीत जाऊ नयेत, यासाठी आरोग्य विभागाला विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कुपोषित बालकांना त्यांच्या पालकांसह राहण्याची-भोजनाची आठ दिवस व्यवस्था करून त्यांना योग्य, पोषक आहार देण्याची व्यवस्था केली जाणार आहे. या मोहिमेत डेरवणच्या वालावलकर हॉस्पिटलची मदत घेतली जाणार आहे. जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून या बालकांसाठी आवश्यक औषधं आणि पूरक पोषण आहार उपलब्ध करून दिला जाईल. या कुपोषित बालकांचं कुपोषण दूर करण्यासाठी संबंधित भागातले जिल्हा परिषद सदस्य त्यांच्या प्रभागातल्या बालकांचं पालकत्व स्वीकारतील, असे निर्णय या बैठकीत घेण्यात आले.

ग्रामीण भागातल्या जनतेला स्थानिक पातळीवरच दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी दरवर्षी १० प्राथमिक आरोग्य केंद्रं अद्ययावत करण्याचा निर्णय घेण्यात आला. या अद्ययावतीकरणाच्या कामासाठी १० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद बैठकीत करण्यात आली आहे. बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, शिक्षण व अर्थ सभापती नंदकुमार मुरकर, महिला-बालविकास सभापती मयुरी शिर्के आदी उपस्थित होते.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply