रत्नागिरी : 'कुटुंब चांगलं असेल, तर उत्तम समाज घडतो. सुसंस्कारित कुटुंबव्यवस्थेतूनच सुदृढ समाजाची निर्मिती होते,' असं प्रतिपादन राष्ट्रसेविका समितीच्या सहकार्यवाह उमाताई दांडेकर यांनी केलं. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा दक्षिण रत्नागिरी भाग आणि रत्नागिरी नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीत प्रथमच भरवण्यात आलेल्या वरदाम् युवती संमेलनात त्या बोलत होत्या. पंचपरिवर्तन या विषयावर विचार मांडताना दांडेकर यांनी कुटुंबव्यवस्थेचं महत्त्व अधोरेखित केलं. युवतींच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणं, त्यांच्यामध्ये सामाजिक जाणीव जागृत करणं आणि त्यांना विविध क्षेत्रांमध्ये कर्तृत्व गाजवण्यासाठी प्रेरित करणं, हा या संमेलनाचा उद्देश होता. रत्नागिरीच्या नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन यांच्यासह विविध क्षेत्रांतले मान्यवर या संमेलनाला उपस्थित होते.
संमेलनाची सुरुवात ‘पंचतुंड नररुंड’ या नांदीने झाली. संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात झालेल्या परिसंवादात रत्नागिरीतली प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर कश्ती शेख, प्राचीन कोकणच्या संचालिका स्वरूपा सरदेसाई आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या जिल्हा संयोजक आणि छात्रनेत्या श्रावणी महाजन सहभागी झाल्या होत्या. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या कल्पना आठल्ये यांनी या परिसंवादाचं सूत्रसंचालन केलं. या परिसंवादात कश्ती शेख यांनी आपल्या आयुष्यातला अनुभव सांगताना एका छोट्या निर्णयामुळे आयुष्याला कशी नवी दिशा मिळाली, हे सांगितलं. योग्य वेळी घेतलेला छोटासा निर्णयही व्यक्तीच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणू शकतो, हा प्रेरक संदेश त्यांच्या अनुभवातून उपस्थित युवतींना मिळाला. 'महिलांनी उद्योग क्षेत्रात पुढाकार घेऊन स्वतःच्या क्षमतांचा विकास करावा आणि स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करावी,' असं आवाहन सौ. स्वरूपा सरदेसाई यांनी केलं. श्रावणी महाजन यांनी आपल्या SEIL उपक्रमातील सहभागाचा, तसंच संसद भवन भेटीचा अनुभव सांगितला. 'विद्यार्थ्यांनी केवळ स्वतःपुरता विचार न करता देशाच्या हिताला प्राधान्य देणारी व्यापक दृष्टी विकसित केली पाहिजे. भारताचा विद्यार्थी हा केवळ स्वतःचा नव्हे, तर संपूर्ण भारताचा विचार करणारा असला पाहिजे,' असं प्रतिपादन त्यांनी केलं. संमेलनाच्या समारोपप्रसंगी नटराज कथ्थक क्लासेसच्या विद्यार्थिनींनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या ‘स्वतंत्रते भगवती’सह विविध गीतांवर नृत्याविष्कार सादर केला. या सांस्कृतिक कार्यक्रमातून भारतीय संस्कृती, देशभक्ती आणि कलाविष्कार यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. समारोपावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कोकण प्रांत उपाध्यक्ष प्रा. शिवराज कांबळे, दक्षिण रत्नागिरी जिल्हाप्रमुख प्रा. अमोल सहस्रबुद्धे आणि शहरमंत्री ज्ञानेश्वर चंदनकर उपस्थित होते. युवतींनी आत्मविश्वासाने पुढे यावं, स्वतःच्या क्षमतांची ओळख करून घ्यावी, सामाजिक बांधिलकी जपावी आणि राष्ट्राच्या उभारणीत सक्रिय योगदान करावं, असा प्रेरणादायी संदेश देण्यासाठी हे संमेलन आयोजित करण्यात आलेलं हे संमेलन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलं.
Follow Kokan Media on Social Media

