आम्ही सिद्ध लेखिका संस्थेच्या ‘माणिकमोती’ दिवाळी अंकाचे प्रकाशन

आम्ही सिद्ध लेखिका संस्थेच्या ‘माणिकमोती’ दिवाळी अंकाचे प्रकाशन

रत्नागिरी : ‘आम्ही सिद्ध लेखिका, कोकण विभागाच्या ‘माणिकमोती’ दिवाळी अंकाचे प्रकाशन आणि नवरात्रोत्सव अ. के. देसाई हायस्कूल येथील सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात झाला.

‘माणिकमोती’ दिवाळी अंकाच्या प्रकाशनाचे हे तिसरे वर्ष असून या उपक्रमातून कोकण विभागातील लेखिकांच्या साहित्यिक आणि कलात्मक प्रतिभेला हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. या अंकामध्ये सदस्यांनी लिहिलेल्या कथा, कविता, लेख, प्रवासवर्णने, कवितांचे रसग्रहण, त्यांनी साकारलेल्या कलाकृतींची छायाचित्रे तसेच विविध पाककृतींचा समावेश करण्यात आला आहे. साहित्य, कला आणि संस्कृती यांचा सुरेख संगम साधणाऱ्या या अंकातून लेखिकांच्या विविधांगी प्रतिभेचे दर्शन घडते.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून रत्नागिरीतील जी. जी. पी. एस. शाळेच्या निवृत्त शिक्षिका, लेखिका आणि कवयित्री सौ. समिधा बाष्टे उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीपूजनाने करण्यात आली. यावेळी कार्याध्यक्षा सौ. ऋतुजा कुलकर्णी यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची भूमिका मांडली, तर कोकण विभागप्रमुख सौ. सुनेत्रा जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. तांत्रिक विभागप्रमुख सौ. उमा जोशी यांनी ‘माणिकमोती’ दिवाळी अंकाच्या निर्मिती प्रक्रियेची माहिती दिली.

सौ. समिधा बाष्टे म्हणाल्या, मोबाइलच्या जमान्यातही लेखन आणि वाचनात सातत्य राखून सलग तीन वर्षे दर्जेदार दिवाळी अंक प्रकाशित करणे ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. त्यांनी संस्थेच्या या साहित्यिक उपक्रमाचे विशेष कौतुक करून लेखिकांच्या सर्जनशील प्रयत्नांना प्रोत्साहन दिले.

दिवाळी अंकाच्या प्रकाशनासोबतच नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून देवी आणि नवरात्र या विषयांवर आधारित कविता, गीते तसेच गोंधळाचे सादरीकरण करण्यात आले. सदस्यांच्या कलाविष्कारामुळे कार्यक्रमाला साहित्यिक आणि सांस्कृतिक रंगत प्राप्त झाली. साहित्याची आवड जोपासतानाच परंपरा आणि संस्कृती यांचे जतन करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

यावेळी अर्चना देवधर, कुंदा बापट, राधिका आठल्ये, उमा देवळे, लता जोशी, शमा प्रभुदेसाई, विशाखा पाटोळे, मनीषा पटवर्धन, गौरी थत्ते, चित्रा गोस्वामी, डॉ. स्वप्नजा मोहिते यांच्यासह संस्थेच्या सदस्या उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाखा पाटोळे यांनी केले, तर उमा जोशी यांनी आभार मानले.

000000000 आम्ही सिद्ध लेखिका कोकण विभागाच्या माणिकमोती दिवाळी अंकाचे प्रकाशन करताना कार्याध्यक्षा सौ. ऋतुजा कुळकर्णी, कोकण विभाग प्रमुख सुनेत्रा जोशी, सौ. समिधा बाष्टे, तांत्रिक विभाग प्रमुख उमा जोशी

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply