सावंतवाडी : मालवणी मुलखात शिक्षकी पेशा स्वीकारून आपल्या मातीशी इमान राखून साहित्य उपासना, सेवा करणे हेच विद्याधर भागवत आणि सी. श्री. उपाध्ये यांचे जीवनध्येय होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक व मालवणी कला, संस्कृतीचे अभ्यासक सतीश पाटणकर यांनी काढले.
साहित्यिक कै. विद्याधर भागवत आणि श्री. सी. श्री. उपाध्ये यांच्या साहित्यकृतींचा परिचय व जागर नव्याने व्हावा, यासाठी सावंतवाडीच्या राणी पार्वतीदेवी हायस्कूलमध्ये भागवत यांचे कुटुंबीय रवींद्र भागवत, श्रिया भागवत आणि साहित्यप्रेमी मंडळाने परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी श्री. पाटणकर बोलत होते.
श्री. पाटणकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रतिभेचे अलौकिक लेणे लाभलेले साहित्यिक व महान कवी आरती प्रभूंचे स्मारक म्हणून चिंतामणी साहित्य सहयोग सहकारी संस्था स्थापन करून त्यांनी अनेकांना लिहिते केले आणि त्यांचे लेखन प्रकाशित केले. पदरमोड करत 'आरती' मासिक सुरू करून नवोदितांना लेखन-प्रकाशनाची वाट सुकर केली. त्याचबरोबर स्वतःही कथा, कविता व कादंबरीलेखन करून कोकणी निसर्ग व माणसांचे जीवन चित्रण केले. माझ्यासारख्या अनेकांना त्यांनी व कविवर्य वसंत सावंत यांनी प्रेरणा दिली. हे त्यांचे हे कार्य चिरस्मरणीय आहे. या दृष्टीने हा उपक्रम फारच महत्त्वाचा आहे.
ते पुढे म्हणाले की, साहित्यिक उपक्रमांना अलीकडे उपस्थिती कमी मिळते पण या परिसंवादाच्या निमित्ताने चंदगड, दोडामार्ग, कुडाळ, कणकवली येथील निबंधवाचक उपस्थित आहेत, जे बीज आपल्या तत्कालीन साहित्यक्षेत्रातील वडिलधाऱ्यांनी पेरले होते त्याला मिळालेले हे यश आहे. पुणे विद्यापीठात भागवत सरांच्या लेखनावर संशोधन पदवी मिळते, हा त्यांचा गौरव आहे. या दोन्हीं लेखकांवर होणारी साहित्यिक चर्चा पुढील काळात मैलाचा दगड ठरेल व कोकणातील प्रत्येक कलावंत, लेखक, कवी यांच्या जीवनकार्यावर असे कार्यक्रम आयोजित करावेत.
यावेळी दहा अभ्यासकांनी शोधनिबंध सादर केले. सुरुवातीला शंकर प्रभू यांनी भागवत सरांच्या काही कविता सादर केल्या. श्रिया भागवत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर बाळकृष्ण लळीत यांनी परिसंवादाचे सूत्रसंचालन केले. परिसंवादात स्मिता शेटकर,अंजली मुतालिक, रवींद्र भागवत. श्वेतल परब, श्रिया भागवत, सुरेखा चव्हाण, बाळकृष्ण लळीत यांनी शोधनिबंध सादर केले. कार्यक्रमाला विठ्ठल कदम, बाळ पुराणिक, रवींद्र ओगले, साधना तेंडुलकर, प्रा. भाऊ गोसावी, मयूर गवळी, विनायक महाबळ, माजी मुख्याध्यापिका सोनाली सावंत यांच्यासह अनेक रसिक मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते. संयोजक रवींद्र भागवत यांनी आभार मानले.
Follow Kokan Media on Social Media

