कोकण स्वरप्रतिभा बाल-शास्त्रीय गायन स्पर्धेत ऋग्वेद तेरेदेसाई प्रथम

रत्नागिरी : कोकण स्वरप्रतिभा या कोकणस्तरीय शास्त्रीय गायन स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीच्या ऋग्वेद प्रवीण तेरेदेसाई याने प्रथम क्रमांक पटकावला. गोवा येथील स्वस्तिक कल्चरल असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेची अंतिम फेरी गोवा कला अकादमीच्या कृष्ण कक्षात उत्साहात पडली. ऋग्वेद हा रत्नागिरीच्या ‘स्वराभिषेक’ संगीत वर्गाचा शिष्य आहे.
कोकण स्वरप्रतिभा स्पर्धेत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड व गोवा, तसेच कर्नाटकातील कारवार ते मंगळूर अशा ठिकाणचे सात ते १५ वर्षे वयोगटातील विद्यार्थी सहभागी झाले होते. प्राथमिक फेरी ऑनलाइन पद्धतीने होऊन त्यातून कोकण विभागातील विविध भागांतून १५ जणांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. यामध्ये ‘स्वराभिषेक-रत्नागिरी’च्या ऋग्वेद तेरेदेसाई या बालकलाकाराने विजेतेपद पटकावले. गुरू सौ. विनया परब यांच्या मार्गदर्शनाखाली ऋग्वेद शास्त्रीय संगीताचे धडे गिरवत आहे.

अंतिम फेरीत ऋग्वेदने मध्य झपतालात बद्ध वृंदावनी सारंग रागातील बंदीश आणि त्रितालातील एक छोटा ख्याल सादर केला. आत्मविश्वासपूर्ण आणि सफाईदार आलाप, तानांसह सुरेल सादरीकरणाने ऋग्वेदने उपस्थितांची वाहवा मिळवली आणि कोकण स्वरप्रतिभा बनण्याचा मान मिळवला. गोव्याची वैभवी प्रभाकर भट आणि स्वरा शैलेश शिरोडकर यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. मोक्ष जितेन कटारिया आणि श्रीयश परब यांना उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला. रोख पारितोषिक व स्मृतिचिन्ह देऊन विजेत्यांचा गौरव करण्यात आला.
गायकांना सतीश नाईक, राहुल अईर व सारंग केरकर यांनी तबलासाथ, तर वसंत गावकर, समृद्धी नाईक, प्रणय पार्सेकर यांनी संवादिनीसाथ केली. स्पर्धेचे परीक्षण समीक्षा काकोडकर, सम्राज्ञी शेलार अईर, सुभाष फातर्पेकर यांनी केले. या वेळी पी. के. मुखर्जी, डॉ. अजित म्हापणे, कायतानो कार्व्हालो, डॉ. प्रवीण गावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply