कृषी दिनाचे औचित्य साधून चारसूत्री भातलागवड स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा सन्मान

रत्नागिरी : माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्ताने नाणीज ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हेच औचित्य साधून चारसूत्री भातलागवड स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

जिल्हा परिषद कृषि विभाग, रत्नागिरी पंचायत समिती, महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आणि लांजा कृषी विज्ञान केंद्राच्या संयुक्त विद्यमाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे होत्या. प्रमुख उपस्थिती म्हणून समाजकल्याण सभापती अ‍ॅड. सुयोग कांबळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम सुर्वे, कृषी विकास अधिकारी अभिजित गडदे, जिल्हा कृषी अधिकारी विकास मुळीक, रत्नागिरी पंचायत समिती सभापती प्रवीण पांचाळ, गटविकास अधिकारी चेतन शेळके, उपसभापती गजानन धनावडे, नाणीज ग्रामपंचायतीचे प्रशासक विनायक शिवगण, पंचायत समिती सदस्या डॉ. पद्मजा कांबळे, विद्या बोंबले आदी उपस्थित होते.

​कार्यक्रमाची सुरुवात श्री धावजेश्वर मंदिर येथे वृक्षलागवड करून व पारंपरिक पद्धतीने वृक्षदिंडी काढून करण्यात आली. त्यानंतर मुख्य सभागृहात दीपप्रज्वलन आणि प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पाहुण्यांचे स्वागत झाले. कृषि विकास अधिकारी श्री. गडदे यांनी प्रास्ताविक केले. या सोहळ्यात रत्नागिरी तालुक्यातील चारसूत्री भातलागवड पीक स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकरी बांधवांना प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

​कार्यक्रमात शेतकऱ्यांसाठी विशेष तांत्रिक सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बदलते हवामान (एल निनो प्रभाव) आणि त्याचा शेतीवर होणारा परिणाम याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या संकटावर मात करण्यासाठी नैसर्गिक शेतीचे महत्त्व किती गरजेचे आहे, यावर कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. आनंद हणमंते यांनी मार्गदर्शन केले. डॉ. एम. एम. महाले यांनी कोकणातील प्रमुख पिके असलेल्या भात आणि नाचणीच्या आधुनिक व सुधारित लागवड तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती दिली.

​कार्यक्रमाच्या सांगतेवेळी उपस्थित सर्व शेतकरी बांधवांना विविध उपयुक्त रोपांचे मोफत वितरण करण्यात आले. माजी शिक्षक सुशील जाधव यांनी सूत्रसंचालन केले.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply