रत्नागिरी : पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते बालकाला पोलिओ लशीचा डोस पाजून आज रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. जिल्हा शासकीय रुग्णालयात झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
जिल्ह्यातल्या पाच वर्षांपर्यंतच्या एकूण ५८ हजार ८१५ बालकांचं लसीकरण करण्याचं उद्दिष्ट आरोग्य विभागाने ठेवलं असून, त्यांपैकी ग्रामीण भागातील बालकांची संख्या ५६,६२९, तर शहरातल्या बालकांची संख्या २१८६ आहे. लसीकरणासाठी एकूण १६५९ बूथ सज्ज असून, ३४७७ कर्मचारी आणि ३४६ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. दुर्गम आणि तात्पुरत्या वस्त्यांसाठी १५० मोबाइल टीम्स कार्यरत असून, प्रवासात असलेली मुलंही लसीकरणापासून वंचित राहू नयेत म्हणून ३४ ट्रान्झिट टीम्सही सज्ज आहेत. या लसीकरणानंतर ग्रामीण भागात तीन दिवस आणि शहरी भागात पाच दिवस आरोग्य पथकं एकूण चार लाख ३८ हजार घरांना भेट देणार असून, लसीकरण न झालेल्या मुलांचं लसीकरण करणार आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेने १९८८मध्ये पोलिओ निर्मूलनाचं ध्येय निश्चित केल्यानंतर महाराष्ट्रात १९९५ पासून ही मोहीम सातत्याने राबवली जात आहे. भारतात १३ जानेवारी २०११ नंतर एकही पोलिओ रुग्ण आढळलेला नाही. मार्च २०१४ मध्ये भारताला पोलिओमुक्त देशाचं प्रमाणपत्र मिळालं आहे. हाच स्तर कायम राखण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने जय्यत तयारी केली आहे.
जिल्ह्यातील पालकांनी पाच वर्षांखालील आपल्या प्रत्येक बालकाला पोलिओ लशीचे दोन थेंब पाजून, या राष्ट्रीय मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा आणि देशाला पोलिओमुक्त ठेवण्याच्या संकल्पात आपला हातभार लावावा, असं आवाहन पालकमंत्री सामंत यांनी केलं आहे. आरोग्य विभागाने लसवाहक, बर्फाची पाकिटं आणि शीतसाखळी व्यवस्था पूर्णपणे सज्ज ठेवली असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं, असं आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आठल्ये यांनी केलं आहे.

