रत्नागिरी : अवैधरीत्या गोवंश मांस बाळगल्याप्रकरणी रत्नागिरी पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एका व्यक्तीला अटक केली. या कारवाईत ५१.५०० किलोग्रॅम गोवंश मांस, एक दुचाकी आणि डीप फ्रीजर असा एकूण एक लाख सहा हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मोहरमच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडक पोलीस बंदोबस्त होता. त्या वेळी गस्त सुरू असताना ही कारवाई करण्यात आली.
रत्नागिरी शहरातील उद्यमनगर परिसरातील लांजेकरनगर येथील लियाकत शौकत दावत (वय ४८) याने गोवंशाचे मांस विनापरवाना विक्रीसाठी बाळगले असल्याची माहिती पोलिसांच्या पथकाला मिळाली. पथकाने पंचांसमक्ष कारवाई करून संबंधिताला ताब्यात घेतले. पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या प्राथमिक पडताळणीनंतर गोवंश मांस जप्त करण्यात आले. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ३२५, तसेच महाराष्ट्र पशुसंरक्षण (सुधारणा) अधिनियम, २०१५मधील कलम ५ (ब), ५ (क), ९ (अ) आणि मोटार वाहन अधिनियम, १९८८मधील कलम ६६ (१), १९२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप ओगले, तसेच स्वाती राणे, विजय आंबेकर, योगेश नार्वेकर, गणेश सावंत, सत्यजित दरेकर आणि अतुल कांबळे यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

