‘टीईटी’चा पेपर फुटला; दीड कोटीत होणार होता सौदा! दिल्लीतून आणले पेपर; आरोपींना अटक

ठाणे : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी २०२६ ही परीक्षा २८ जून २०२६ रोजी होणार होती. त्याच्या एक दिवस आधीच पेपरफुटीचा मोठा प्रकार भिवंडीत उघडकीस आला आहे. पोलिसांनी मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करून तिघांना अटक केली आहे. आरोपी दिल्लीहून टीईटी परीक्षेची प्रश्नपत्रिका घेऊन भिवंडीत आले होते आणि ते सुमारे दीड कोटी रुपयांमध्ये विकण्याच्या तयारीत होते, असे प्राथमिक तपासात समजले आहे. या गंभीर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, रविवारी होणारी टीईटी परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने पुढे ढकलली असून, नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. या घटनेमुळे राज्यभरातील लाखो उमेदवारांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे.

गुप्त माहितीच्या आधारे पोलीस उपायुक्त पवन बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली भिवंडी पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली आणि तिघांना रंगेहाथ अटक केली. राजीव शॉ (बिहार), आकाश कुमार (बिहार) आणि धीरज सिंह (हरियाणा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून मोबाइल फोन, रोख रक्कम आणि दुसऱ्या दिवशी होणाऱ्या टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे चार संच जप्त करण्यात आले आहेत.

जप्त केलेल्या प्रश्नपत्रिकांची पडताळणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी केली असता, ती मूळ प्रश्नपत्रिकांशी जुळत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. आरोपी भिवंडीत कोणाच्या संपर्कात आले होते, त्यांच्यामागे कोणते मोठे रॅकेट कार्यरत आहे, या प्रकरणात कोणत्या शैक्षणिक संस्था किंवा स्थानिक एजंटचा सहभाग आहे का, तसेच या संपूर्ण नेटवर्कचा सूत्रधार कोण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. दीड कोटी रुपयांच्या या कथित व्यवहारासंबंधी आर्थिक व्यवहारांचाही तपास सुरू आहे.

‘या पेपरफुटीची तात्काळ निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा, अन्यथा तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांच्या विरोधात काँग्रेस लवकरच रस्त्यावर उतरेल,’ असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे. नीट पेपरफुटीचे प्रकरण ताजे असतानाच टीईटीचाही पेपर फुटला आहे. भाजप सरकारचा कारभार अत्यंत ढिसाळ व कुचकामी आहे. फक्त पोकळ घोषणा करण्यातच हे सरकार आघाडीवर असून यांना एक परीक्षाही धड घेत येत नाही, अशी टीका सपकाळ यांनी केली आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply