विलवडे रेल्वे स्थानकावरील आंदोलनानंतर सुविधांबाबत आश्वासन

विलवडे रेल्वे स्थानकावरील आंदोलनानंतर सुविधांबाबत आश्वासन

लांजा : विलवडे रेल्वे स्थानकावरील लाक्षणिक उपोषणानंतर सुविधांबाबत कोकण रेल्वे प्रशासनातर्फे आश्वासने देण्यात आली.

विलवडे रेल्वे स्थानकावर अधिकाधिक एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मिळावा, तसेच स्थानकावर प्रवाशांसाठी आवश्यक मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी विलवडे रेल्वे प्रवासी संघटना मुंबई व ग्रामीण संघर्ष समितीच्या वतीने रविवार, दि. २० सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाला परिसरातील ७० हून अधिक गावांतील रेल्वे प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रवाशांचा मोठ्या संख्येने झालेल्य सहभागामुळे कोकण रेल्वे प्रशासनाचे लक्ष या प्रश्नाकडे वेधले गेले.

लांजा तालुक्याच्या पूर्व भागात तसेच लांजा-राजापूर तालुक्यांच्या सीमावर्ती परिसरात विलवडे रेल्वे स्थानक महत्त्वाचे प्रवासी केंद्र आहे. लांजा व राजापूर तालुक्यांतील अनेक गावांसह अणुस्कुरा घाटमाथ्यावरील तसेच वैभववाडी तालुक्यातील काही गावांतील नागरिक मोठ्या प्रमाणावर रेल्वे प्रवासासाठी या स्थानकावर अवलंबून आहेत. अशा ७० हून अधिक गावांच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या स्थानकावर अपेक्षित प्रमाणात एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळत नसल्याने प्रवाशांची अनेक वर्षांपासून गैरसोय होत आहे.

विलवडे स्थानकावर पुरेशा गाड्यांना थांबा नसल्यामुळे मुंबईसह अन्य शहरांकडे जाणाऱ्या प्रवाशांना अनेकदा पुढील स्थानकांवर जावे लागते किंवा गर्दीच्या गाड्यांमधून उभ्याने प्रवास करावा लागतो. काही वेळा वेळेची बचत करण्यासाठी अथवा आरक्षण उपलब्ध न झाल्याने प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे त्यांच्या प्रवासाचा खर्चही मोठ्या प्रमाणात वाढतो. या समस्येचा कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी विलवडे स्थानकावर अधिक एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देण्याची मागणी प्रवासी संघटनेने केली आहे. याशिवाय स्थानकावरील प्रवाशांच्या मूलभूत सुविधांचा प्रश्नही गंभीर असल्याचे संघटनेने निदर्शनास आणून दिले. स्थानकावर एकच फलाट असल्यामुळे गाडीत चढताना-उतरताना प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच स्थानकावर उभारण्यात आलेल्या प्रतीक्षालयाचा योग्य वापर होत नसल्याने त्याचीही दुरवस्था झाली आहे. पिण्याचे पाणी, स्वच्छता, आसनव्यवस्था, निवारा यांसह आवश्यक सुविधांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

या सर्व प्रश्नांकडे कोकण रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विलवडे रेल्वे प्रवासी संघटनेने एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले. उपोषणाला संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील असंख्य प्रवासी सहभागी झाले होते. परिसरातील नागरिक, रेल्वे प्रवासी आणि विविध गावांतील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठिंबा दिला.या आंदोलनात संघटनेचे मुंबई अध्यक्ष यशवंत जड्यार, कार्याध्यक्ष रमेश काटकर, ग्रामीण अध्यक्ष अमोल रेडीज, सल्लागार सुभाष लाड, जगदीश राजापकर, गुरुप्रसाद देसाई,विनय गांगण, विश्वनाथ गुरव यांनी मार्गदर्शन केले.

या उपोषणाची दखल घेऊन कोकण रेल्वेचे शैलेश आंबर्डेकर, अहिरे यांनी लांजा तहसीलदार श्रीमती ढोले यांच्या उपस्थितीत शिष्टमंडळाशी चर्चा केली. प्रतीक्षागृह फलाटाला जोडून बांधणे व त्याच बाजूला रॅंप बांधणे, फलाटाला समतल असलेला मार्ग सुव्यवस्थित करून तेथे दिव्यांची व्यवस्था ही कामे लवकरच मार्गी लावू, असे आश्वासन अधिकार्‍यांनी दिले. रस्त्यावरील दिव्यांचा विद्युत पुरवठा सुरळीत करणे, ड्रेनेजच्या उघड्या टाकीला बंदिस्त करणे आदी काम पुढील पंधरा दिवसांत पूर्ण केले जाईल, असे त्यांनी सांगितले. दुसरा फलाट बांधण्याचा प्रस्ताव करून पुढील महिन्यात त्याची माहिती देऊ, असे सांगितले. तसेच रेल्वे मंत्रालयाकडे जनशताब्दी, नेत्रावती, मत्स्यगंधा, कोचुवेली तसेच मांडवी एक्स्प्रेस या गाड्यांना विलवडे येथे थांबा देण्याबाबत पाठविलेल्या प्रस्तावाची सत्यप्रत दिली. यामुळे शिष्टमंडळाने उपोषण स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र या गोष्टींची पूर्तता करण्याच्या दृष्टीने रेल्वेची हालचाल दिसली नाही, तर पुन्हा आंदोलन छेडण्याचे जाहीर केले.

विलवडे रेल्वे स्थानकावर मोठ्या संख्येने पोलिसांचा बंदोबस्तात आंदोलन यशस्वी पार पडले.

आंदोलनाचे सूत्रसंचालन विजय हटकर व काशिनाथ चव्हाण यांनी केले.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply