डॉ. लळीत यांनी उलगडली दक्षिण कोकणच्या आध्यात्मिक रहस्ये

डॉ. लळीत यांनी उलगडली दक्षिण कोकणाची आध्यात्मिक रहस्ये

कुडाळ : येथे आज झालेल्या कार्यक्रमात प्रा. डॉ. बाळकृष्ण लळीत यांनी दक्षिण कोकणच्या आध्यात्मिक रहस्ये या आपल्या पुस्तकातील प्रकरणे उलगडली. कुडाळ हायस्कूलजवळच्या मराठा मंडळ सभागृहात सचिन मणेरीकर यांनी भव्य ग्रंथप्रदर्शन आयोजित केले आहे. वाचकांचा ग्रंथखरेदीला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यानिमित्ताने बाळकृष्ण लळीत यांच्या दक्षिण कोकणच्या आध्यात्मिक रहस्ये लिहिण्याचे अनुभव कथन या विषयावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी तो बोलत होते. ते म्हणाले, मालवणी बोली सहित्याचे संशोधन करताना येथील देवदेवस्की, संत-महात्मे, अलौकिक आणि गूढ वाटणारी स्थळे, लोकसंस्कृतीसंदर्भात मी घेतलेले अनुभव शब्दबध्द करावेत, असे मनाला सारखे वाटत असे. लिखित व मौखिक परंपरेतील शेकडो संदर्भ हाताशी होते. म्हणून मी लिहीत राहिलो. समाजमाध्यमांतून मिळणारा प्रचंड प्रतिसाद व पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या आशीर्वादामुळे ‘दक्षिण कोकणच्या आध्यात्मिक रहस्ये’ ग्रंथरूपाने प्रकाशित झाली. मनाला खूप आनंद झाला नि समाधान मिळाले.

पुस्तकातील पहिल्या व दुसऱ्या खंडात ५० प्रकरणे असून देवचार, बारापाच देवस्की, शोध वेताळ आणि देव रवळनाथाचा या व अशा अनेक विषयांवर लेखन करतानाचे अनुभव कथन डॉ. लळीत यांनी केले. हे अनुभव ऐकताना श्रोते भारावून गेले होते. अॅड. अंजली मुतालिक, सुनील सकरे, सरवटे, सौ. सावंत यांनी विचारलेल्या प्रश्नांना लळीत यांनी समर्पक उत्तरे दिली.

सुरवातीला वाचनवाट ग्रंथप्रदर्शन व दालनाच्या संचालिका मुग्धा शेवाळकर यांनी परिचय करून देऊन स्वागत केले, तर ग्रंथभेट देऊन सचिन मणेरीकर यांनी सत्कार केला.

व्याख्यानाला व ग्रंथप्रदर्शनाला वाचकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. उद्या, दि. १८ ऑक्टोबर रोजी प्रदर्शनाचा अखेरचा दिवस असून सकाळी ९ पासून ते सायंकाळपर्यंत सुरू राहणार असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री. मणेरीकर यांनी केले.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply