लांजा : दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाला दोन कम्युनिटी रेडिओ केंद्रांसाठी सिंधुरत्न योजनेमधून १ कोटी रुपये दिले जातील, अशी घोषणा पालकमंत्री उदय सामंत यांनी केली.
गवाणे (ता. लांजा) येथे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, भारतीय कृषी अनुसंधान परिषद पुरस्कृत कृषी विज्ञान केंद्राच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन आज, ११ फेब्रुवारी रोजी श्री. सामंत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कृषी विज्ञान केंद्राच्या जमिनीचा उपयोग शेतकऱ्यांसाठी झाला पाहिजे. आधुनिक युगात अत्याधुनिक सुविधा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे हा या केंद्राचा उद्देश आहे. रेशीम उद्योगाबाबत व्यापक बैठक आयोजित केली जाईल. महिला, युवक यांना या उद्योगाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी विद्यापीठाने प्रयत्न करावेत. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातूनही प्रत्येक महिलेला रोजगार मिळवून देता येईल. कृषी महाविद्यालय आणि फणस संशोधन केंद्रासाठी ५० एकर जागा देण्याची जबाबदारी माझी आहे, असेही पालकमंत्री म्हणाले. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी चर्चा झाली असून, कृषी महाविद्यालय आणि फणस संशोधन केंद्रांचे प्रस्ताव लवकरच शासनाकडून मान्य करून दिले जातील, असेही श्री. सामंत यावेळी म्हणाले.
कोकण कृषी विद्यापीठाने नावाप्रमाणे चांगले काम करावे. संशोधनात्मक काम करुन शेतकऱ्यांपर्यंत त्याची माहिती पोहोचवावी. त्यांच्या उत्पन्नात वाढ करून ते कर्जमुक्त होतील, असे मार्गदर्शन करावे. कोकण कृषी विद्यापीठ हे शेतकऱ्यांची मातृसंस्था आहे. त्याच मायेने शेतकऱ्यांना लाभ मिळावेत, असेही पालकमंत्री श्री. सामंत शेवटी म्हणाले.
कुलगुरू डॉ. भावे म्हणाले, आजचा शेतकरी अभ्यासू आहे. त्यांनी उत्पादकता वाढवलेली आहे. बांबूवर काम होणे आवश्यक आहे. दहा हेक्टर जागा बांबूसाठी वापरली तर आयात करायची आवश्यकता भासणार नाही.
प्रास्ताविकात डॉ. प्रमोद सावंत यांनी कोकण कृषी विद्यापीठाचा इतिहास आणि सद्यःस्थिती सांगितली. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध उत्पादक शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. शेवटी डॉ. आनंद हणमन्ते यांनी आभार मानले.
यावेळी डॉ. प्रशांत बोडके, डॉ. प्रकाश शिनगारे, नगराध्यक्ष मनोहर बाईत, सरपंच भीमराज कांबळे आदी उपस्थित होते.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

