रत्नागिरी : आंबा बागायतदारांच्या समस्यांबाबत राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आज (१२ एप्रिल २०२३) आढावा बैठक झाली. त्या वेळी पालकमंत्र्यांनी आंबा बागायतदारांच्या समस्या जाणून घेतल्या. राज्य सरकार आंबा बागायतदारांच्या पाठीशी असून, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही उदय सामंत यांनी दिली.
पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, ‘गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा (२०२३) आंबा उत्पादन फक्त १२ ते १५ टक्के असल्याचे दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने सांगितले आहे. तसा अहवाल त्यांनी तात्काळ शासनाकडे सादर करावा, अशा सूचना संबधितांना केल्या आहेत. हवामानातील बदलांमुळे आंबा बागायतदारांचे जे काही नुकसान झाले आहे, त्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आंबा बागायतदारांना मदत करण्याबाबत विनंती करणार आहे. शासनाने आंबा बोर्ड निर्माण करण्याचाही निर्णय घेतला आहे. भविष्यात आंबा बागायतदारांसाठी कायमची तजवीज व्हावी यासाठी काजू बोर्डाप्रमाणे आंबा बोर्डामध्येही निर्णय घेण्यात येतील.’
‘आंब्यावर पडणारे रोग आणि किडींवर संशोधन करण्यासाठी बागायतदारांच्या मागणीनुसार समिती स्थापन करण्यात येणार असून, त्यामध्ये दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठातील दोन शास्त्रज्ञ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, आंबा बागायतदारांचे दोन प्रतिनिधी, कृषी मंत्रालयातील प्रतिनिधी आणि औषधनिर्मात्यांचा एक प्रतिनिधी यांचा समावेश असेल.’
आंबा बागायतदारांसाठी सिंधुरत्न योजनेतून चार कोल्ड स्टोरेज वाहने मंजूर करण्यात आली असून, सुरुवातीला दोन वाहने पुरविण्यात येणार असल्याची माहितीही सामंत यांनी या वेळी दिली.
या वेळी माजी आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे, अन्य अधिकारी, तसेच जिल्ह्यातील आंबा बागायतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

