रत्नागिरी : पुण्यातील विश्व मराठी परिषदेतर्फे रत्नागिरी जिल्ह्यात वेरवली (ता. लांजा) येथे अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या सहयोगाने साहित्य संस्कृती जागर शिबिर आयोजित करण्यात आले आहे. १८ ते ३५ वयोगटातील तरुण-तरुणींसाठी हे शिबिर २२ मे ते २६ मे या काळात होणार आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लांजा बसस्थानकाच्या उत्तरेला १२ किलोमीटर अंतरावर वेरवली या गावी एका प्रशस्त वाड्यामध्ये हे निवासी शिबिर होईल. पुण्यातून शिबिराला येणाऱ्यांसाठी रविवार, दि. २१ मे रोजी रात्री बसची सशुल्क सुविधा केली जाणार आहे. शिबिरात घेऊ इच्छिणारे थेट वेरवली येथेही स्वतंत्रपणेही पोहोचू शकतील. प्रभानवल्लीपर्यंत प्रभानवल्ली हा छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वाधिक महसूल देणारा सुभा होता. अतिशय विलोभनीय आणि निसर्गरम्य असा हा ग्रामीण परिसर आहे. पाच रात्री आणि ४ दिवस अशा एकूण ५ दिवसांचे साहित्य संस्कृती जागर शिबिर आहे. प्रत्यक्ष खेड्यात जाऊन तेथील संस्कृती आणि लोकजीवन याची अनुभूती घेण्यासाठी आणि तेथील ग्रामस्थांबरोबर मनमोकळा संवाद साधून ग्रामीण भारत जाणून घेण्याची ही एक अनोखी संधी आहे.
एक दिवस पायी चालत परिक्रमा, विविध मार्गदर्शकांची व्याख्याने, मुक्त संवाद, चर्चा, साहित्यिकांशी गप्पा असे अनेक कार्यक्रम यात अंतर्भूत आहेत. सोबतीला स्थानिक ग्रामीण भोजनाचा स्वाद घेता येईल. प्रा. क्षितिज पाटुकले, विवेक वेलणकर, डॉ. अजित आपटे, श्याम भुर्के, डॉ. नीलिमा गुंडी, डॉ. अंजली दाणी, साहित्य परिषदेतर्फे नीलिमा बोरवणकर, म. भा. चव्हाण आणि श्रीधर पराडकर मार्गदर्शन करतील.
शिबिरात १८ ते ३५ वयोगटातील सुमारे ७५ तरुणांना प्रवेश मिळेल. प्रत्येकी २१०० रुपये शुल्क भरून प्रवेश घ्यावा. पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. पुणे ते पुणे बस सेवेसाठी वेगळे शुल्क आकारले जाईल. ज्यांना पुणे ते पुणे लक्झरी स्लीपर कोचने यायचे आहे, त्यांना जाऊन-येऊन सुमारे २५०० रुपये अधिक खर्च येईल. शिबिरादरम्यान प्रभानवल्ली हा छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आणि स्वराज्याला सर्वांत जास्त महसूल देणारा सुभा, खोरनिनको येथील मुचकुंदी नदीचा उगम आणि धरण, बल्लाळेश्वर मंदिर, शिवकालीन गढी, वेरवली परिसरातील भटकंती असा कार्यक्रम असेल. निसर्गाच्या सान्निध्यात डोंगरदऱ्यांतून चालताना तळकोकणाचे अद्भुत सौंदर्य अनुभवायला मिळेल. निवासाच्या ठिकाणी राहण्याची सामुदायिक (एकत्रित) स्वरूपाची पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. स्नान आणि स्वच्छतेसाठी सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत.
निवासाच्या ठिकाणी आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ, शेतकरी आणि प्रतिष्ठित व्यक्तींबरोबर चर्चा, गप्पा-गोष्टी आणि विचारांची देवाणघेवाण, ग्रामीण कलांचे सादरीकरण, ग्रामीण खेळ असा उपक्रम असेल. त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारत निसर्गरम्य परिसरात रमण्याची आनंददायी अशी ही संधी आहे. निवासाच्या ठिकाणी सतरंजीची व्यवस्था आहे. पांघरण्यासाठी बेडशीट, पातळ चादर आणावी. आपापले ताट-वाटी, चमचा, भांडे स्वतः आणायचे आहे. चहा, नाश्ता आणि कोकणातील स्थानिक शाकाहारी साधे घरगुती भोजन अशी व्यवस्था आहे.
परिक्रमेला सुरुवात करण्यासाठी २२ मे रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत वेरवली येथे पोहोचणे गरजेचे आहे. एसटीने लांजा (१० किमी) हे स्थानक तर रेल्वेने येण्यासाठी आडवली (१८ किमी), विलवडे (१४ किमी) हे जवळचे रेल्वे स्थानक आहे. मुंबईतून येणाऱ्या कोकणकन्या आणि तुतारी या रेल्वेगाड्या आडवली, विलवडे स्थानकांवर थांबतात. तेथून वेरवलीला जायला वडाप, रिक्षा, जीप अशी वाहने उपलब्ध असतात.
शिबिर झाल्यावर प्रत्येक सहभागी व्यक्तीने सुमारे २००० शब्दांमध्ये यातील अनुभवांवर आधारित प्रवासवर्णन, लेख, कथा अशा प्रकारचे साहित्य लिहावे, अशी अपेक्षा आहे. हे लेखन विश्व मराठी परिषदेतर्फे प्रकाशित केले जाईल.
शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी स्वाती यादव (मोबाइल आणि गुगल पे क्रमांक ९६७३९९८६००) यांच्याकडे पैसे भरून नोंदणी करावी. नोंदणीची अंतिम तारीख ५ मे २०२३ ही आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

