दापोलीत १३ मेपासून कोकण कृषी विद्यापीठाचा ‘सुवर्ण पालवी’ शेतकरी मेळावा

रत्नागिरी : चालू शैक्षणिक वर्षात पन्नास वर्षांची वाटचाल पूर्ण करत असलेल्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातर्फे येत्या १३ ते १७ मे या काळात ‘सुवर्ण पालवी’ शेतकरी मेळावा भरवण्यात येणार आहे. शेतीविषयक प्रदर्शने, परिसंवाद, प्रात्यक्षिके आणि विद्यापीठ क्षेत्राचे दर्शन घडवणारी प्रदक्षिणा अशा विविधांगी उपक्रमांची मेजवानी असलेल्या या मेळाव्यातून विद्यापीठाचे गेल्या पन्नास वर्षांतील कार्य आणि संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे शक्य होईल, अशी माहिती विस्तार शिक्षण विभागाचे संचालक डॉ. संजय भावे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भाट्ये येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्रात आज दुपारी ही पत्रकार परिषद झाली. मेळाव्याच्या उद्घाटन समारंभाला मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांना निमंत्रित करण्यात येणार असून पाचही जिल्ह्यांचे तसेच मुंबईच्या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्री, कृषी मंत्री आणि कृषी राज्यमंत्री उपस्थित राहणार आहेत, असे यावेळी सांगण्यात आले.

यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र करोनाविषयक निर्बंधामुळे मेळावा पुढे ढकलावा लागला. आता तो मे महिन्यात होणार आहे. विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा प्रसार करणे, गेल्या पन्नास वर्षांत केलेले शैक्षणिक कार्य आणि संशोधन यांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत नेणे हे या मेळाव्याच्या आयोजनामागील उद्देश आहे. शेतीमधील उत्पादनांच्या विक्री व्यवस्थेची शेतकऱ्यांना ओळख होण्यास तसेच कृषी विद्यापीठ, कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या इतर संस्था आणि शेतकरी यांच्यात समन्वय साधण्यात हा मेळावा महत्त्वाची भूमिका पार पाडील, असा विश्वास डॉ. भावे यांनी व्यक्त केला.

‘सुवर्ण पालवी २०२२’ नावाच्या या मेळाव्याची माहिती देताना डॉ. भावे म्हणाले की, वेगवेगळ्या कृषी मालाचे उत्पादन वाढविण्यासंबंधी आणि हवामान बदलांबाबत शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न मेळाव्यातून केला जाईल. विद्यापीठाच्या क्रीडा संकुलाच्या प्रांगणात हा मेळावा १३ ते १७ मे या तारखांना होईल. सुमारे एक लाख शेतकरी व नागरिक या मेळाव्याला भेट देतील, असा अंदाज विद्यापीठातर्फे वर्तविण्यात आला. ‘पितांबरी इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट्स’ हे या मेळाव्याचे मुख्य प्रायोजक असतील आणि शुअरशॉट इव्हेंट मॅनेजमेंट प्रा. लि. या कराड येथील उद्योगतर्फे मेळाव्याच्या व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडण्यात येईल. राज्यातील इतर तीन कृषी विद्यापीठे, शासनाचे विविध विभाग, कृषी क्षेत्रातील उद्योग व उद्योजक यांबरोबरच इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स आणि शेतीविषयक इस्रायली तंत्रज्ञानातील जाणकार कंपन्यांचा सहभाग ही मेळाव्यातील महत्त्वाची बाब असेल.

विद्युतशक्तीवर चालणाऱ्या शेतकऱ्यांच्या उपयोगाचे दालन हे या मेळाव्यातील एक महत्त्वाचे आकर्षक असेल. मेळाव्यानिमित्त भरविण्यात येणाऱ्या पशुधन प्रदर्शनात शेतीला साहाय्यक प्राण्यांच्या विविध प्रजाती पाहायला मिळतीलच, शिवाय एक श्वान प्रदर्शनही आयोजित करण्यात येणार आहे. त्यात विविध प्रकारचे कुत्रे आपले कलागुण सादर करतील.

विविध १३ चर्चासत्रे पाच दिवसांत होणार आहेत. दररोज किमान दोन सत्रे होतील. प्रत्येक सत्राला १०० शेतकरी उपस्थित राहतील, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. मत्स्योत्पादन, खेकडा, औषधी आणि सुगंधी वनस्पती, कृषी पर्यटन, प्रक्रिया उद्योग, कुक्कुटपालन, शेळीपालन, महिला सक्षमीकरण, सेंद्रिय शेती, खारजमिनीतील शेती, बदलत्या हवामानातील तंत्रे याविषयीची ही चर्चासत्रे असतील. चर्चासत्रांकरिता शेतकऱ्यांनी ४ मेपूर्वी नोंदणी करावी असे सुचविण्यात आले आहे.

मेळाव्याच्या दरम्यान बांबू प्रशिक्षण घेतले जाणार आहे. कोकणातील सुमारे पाच लाख हेक्‍टर पडीक जमिनीवर बांबूची लागवड करणे शक्य आहे. ती वाढविण्यासाठी आणि बांबूपासून निर्माण होणाऱ्या वस्तूंची माहिती व्हावी, यासाठी हे हे प्रशिक्षण होणार आहे, असे डॉ. भावे यांनी सांगितले.

यावेळी नारळ संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. वैभव शिंदे, लांजा येथील कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. हणमंते आणि दापोलीतील शेतकरी मेळाव्याचे मुख्य प्रायोजक पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई उपस्थित होते. श्री. प्रभुदेसाई यांनी विद्यापीठाचा आपल्याला कसा लाभ झाला, याविषयी महत्त्वाची माहिती दिली.

दापोलीच्या कृषी माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ. संतोष वरवडेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply