जिल्हास्तरीय कृषी तंत्रज्ञान विस्तार सप्ताहाचे उद्घाटन; कृषी आणि पशू प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद

रत्नागिरी : रत्नागिरीत आज (१० मे) अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांच्या हस्ते जिल्हास्तरीय कृषी तंत्रज्ञान विस्तार सप्ताह आणि कृषी विकास परिषदेचं उद्घाटन झालं. रत्नागिरी शहरातल्या प्रमोद महाजन क्रीडा संकुलात १२ मेपर्यंत चालणार असलेल्या या कार्यक्रमात कृषी आणि पशु-पक्षी प्रदर्शनही भरवण्यात आलं आहे. ‘शासनाच्या शेतकऱ्यांसाठीच्या विविध योजनांची माहिती प्रदर्शनातून मिळणार आहे. भारत कृषिप्रधान देश असून, कृषी उत्पादनाचा लोकसंख्येशी मेळ घालणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाचा उत्पादनवाढीच्या दृष्टिकोनातून लाभ घ्यावा आणि विविध परिसंवादांचाही लाभ घ्यावा,’ असं प्रतिपादन गलांडे यांनी या वेळी केलं. (व्हिडिओ बातमीच्या शेवटी)
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, तहसीलदार राजाराम म्हात्रे, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक विजय बेतीवार, दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर यांच्यासह अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते. पालकमंत्री डॉ. उदय सामंत या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते; मात्र भारत-पाकिस्तानात सध्या सुरू असलेल्या हल्ल्यांमध्ये वीरमरण आलेले मुंबईतले जवान मुरली नाईक यांच्या अंत्यदर्शनासाठी सामंत त्यांच्या मूळ गावी आंध्र प्रदेशात गेल्यामुळे ते प्रत्यक्ष उपस्थित राहिले नाहीत. त्यांनी व्हिडिओद्वारे कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. ‘शेतकऱ्यांना खैराची रोपं मोफत देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला असून, काजू-आंबा बागायतदारांसाठी सिंधुरत्न योजनेतून कूलिंग व्हॅन्स घेण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आपण सदैव सोबत आहोत,’ असं प्रतिपादन सामंत यांनी व्हिडिओतून केलं. वेगवेगळ्या सुधारित जातींच्या पिकांचं बियाणं, अवजारं, कृषी योजनांची माहिती देणाऱ्या स्टॉल्ससह बचत गटांची उत्पादनं, बँका असे सुमारे १६० स्टॉल्स या प्रदर्शनात आहेत.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply