रामभाऊ साठे वस्तुसंग्रहालयाचे रविवारी चिपळूणला उद्घाटन

चिपळूण : येथील शतकोत्तर हीरक महोत्सवी लोकमान्य टिळक स्मारक वाचनमंदिराच्या रामभाऊ साठे वस्तुसंग्रहालयाचे उद्घाटन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते रविवारी (दि. ११ मे) रोजी होणार आहे.

चार वर्षांपूर्वीच्या भयावह महापुरात झालेल्या अपरिमित नुकसानीतून अत्यंत परिश्रमपूर्वक सावरलेले वस्तुसंग्रहालय शासनाच्या सहकार्याने वाचनालयाच्या अप्पासाहेब साठे सभागृहाच्या दुसऱ्या मजल्यावर नव्याने उभे राहिले आहे. या ठिकाणी मागील पाचशे वर्षांपासूनच्या अप्रतिम शिल्पकलेच्या व अलौकिक धातुशास्त्राच्या मूर्ती व ऐतिहासिक व अत्यंत दुर्मिळ शस्त्र ते अश्मयुगीन हत्यारांपर्यंतचा खजिना स्थानापन्न झाला आहे. हरणाच्या शिंगाचे ‘माडू’ हत्यार, शत्रूच्या शरीरात आणि विशेषतः पोटात मारून त्याची आतडी ओढणारे ‘गुर्ज’ हत्यार आदी विविध काळातील शस्त्रे, कोकणातील नारळाच्या झापांचे घर, शिमगा-संकासूर, ग्रामदेवतांची पालखी आदी ऐवज पाहता येणार आहेत. चिपळूणचे लोकमान्य टिळक स्मारक वाचनालय पुस्तकांची केवळ देवाणघेवाणीपुरते मर्यादित न राहाता मुक्त वाचनालय, कलादालन, ऐतिहासिक दस्तावेजाचे लोकजागरण यांसह स्वातंत्र्यसमरातील क्रांतिकारक व त्यांचे कार्य, स्पर्धा परीक्षार्थीसाठी अरविंद जाधव अपरान्त संशोधन संस्थेसह कार्यरत आहे.

लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे हे संग्रहालय २०२१ मध्ये चिपळूणला आलेल्या महापुरात उद्ध्वस्त झाले होते. संचालक मंडळाने पुरामुळे निर्माण झालेल्या चिखलातून एकेक वस्तू गोळा करून ठेवली होती. पालकमंत्री उदय सामंत यांनी उद्ध्वस्त झालेल्या संग्रहालयाला भेट देऊन संग्रहालय पुन्हा उभे करण्यासाठी खास बाब म्हणून निधी उपलब्ध करून दिला होता.

रविवारी सकाळी ११ वाजता वाजता चिपळूणमधील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात होणाऱ्या या कार्यक्रमाला आमदार शेखर निकम, माजी आमदार रमेश कदम, चिपळूण पालिकेचे प्रशासक विशाल भोसले आणि पुरातनवस्तू संग्राहक डॉ. श्रीधर ठाकूर उपस्थित राहणार आहेत.
संग्रहालयाच्या या उद्घाटन समारंभाला सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरच्या संचालक मंडळाने केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply