अखेर पाकिस्तानला उपरती! लष्करी कारवाई थांबवण्याचा भारत-पाकिस्तानचा चर्चेअंती निर्णय

नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर सात मे रोजी हल्ले करून ते तळ उद्ध्वस्त केले. ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव दिलेल्या या मोहिमेनंतर हादरलेल्या पाकिस्तानने त्यानंतर सातत्याने केलेल्या हल्ल्यांना भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले. त्यात पाकिस्तानचे बरेच नुकसान झाले. अखेर आज (१० मे) दुपारी पाकिस्तानला उपरती झाली आहे. पाकिस्तानच्या लष्करी कारवाई विभागाच्या महासंचालकांनी (डीजीएमओ) दुपारी तीन वाजून ३५ मिनिटांनी भारताच्या ‘डीजीएमओं’ना फोन करून चर्चा केली. त्या चर्चेत असे ठरवण्यात आले, की दोन्ही देशांकडून सर्व प्रकारची (जमीन, हवाई आणि सागरी) लष्करी कारवाई आज सायंकाळी (१० मे ) पाच वाजल्यापासून थांबवण्यात येईल. तशा सूचना दोन्ही देशांमध्ये संबंधितांना दिल्या गेल्या आहेत, अशी माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी विशेष पत्रकार परिषदेत दिली. १२ मे २०२५ रोजी दोन्ही देशांचे डीजीएमओ अधिकारी पुन्हा एकदा चर्चा करणार आहेत.

शस्त्रसंधीची चर्चा भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये थेट झाली आहे, असे भारताकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अन्य कोणत्याही मुद्द्यावर अन्य कोणत्याही ठिकाणी चर्चा करण्याबद्दल कोणताही निर्णय झालेला नाही, असेही पीआयबीच्या अधिकृत पोस्टमध्ये म्हटले आहे. भारताने सर्व प्रकारच्या दहशतवादाविरोधात नेहमीच कणखर भूमिका घेतली असून, यापुढेही ती तशीच राहील,अशी ग्वाही परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी सोशल मीडिया पोस्टमधून दिली आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताची प्रतिक्रिया अतिशय जबाबदार होती; मात्र पाकिस्तानने चुकीची माहिती पसरवण्याचा खूप प्रयत्न केला, अशी माहिती कमांडर रवी नायर यांनी दिली. सध्या शस्त्रसंधी लागू करण्यावर दोन्ही देशांची सहमती झाली आहे; मात्र परिस्थिती आणखी बिघडवण्याचा कोणताही प्रयत्न पाकिस्तानने केल्यास त्याला सडेतोड उत्तर मिळेल, असेही कमांडर रवी नायर यांनी सांगितले. (उर्वरित बातमी जाहिरातीच्या खाली)

पाकिस्तानच्या हल्ल्यांमध्ये भारताचे नुकसान झाल्याचे पाकिस्तानने केलेले दावे साफ खोटे असल्याचे कर्नल सोफिया कुरेशी यांनी स्पष्ट केले. भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता अबाधित ठेवण्यासाठी सशस्त्र दले वचनबद्ध असल्याची ग्वाही कुरेशी यांनी दिली.

भारताने पाकिस्तानातील एका मशिदीला लक्ष्य केल्याचा दावा खोटा असल्याचे विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी स्पष्ट केले. भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र असून, कोणत्याही प्रार्थनास्थळांवर भारताने हल्ला केलेला नाही, असे सांगतानाच फक्त भारतविरोधी कारवाया करणाऱ्या ठिकाणांवर हल्ले केल्याची माहिती सिंह यांनी दिली. या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचे मोठे नुकसान झाल्याची माहितीही त्यांनी दिली.

भविष्यात घडणाऱ्या कोणत्याही दहशतवादी कृत्याला देशाविरुद्ध युद्धाची कृती मानून त्याला प्रत्युत्तर देण्याचा निर्णय भारताने घेतला आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे. भविष्यात कुरापती काढल्यास ऑपरेशन सिंदूरसारखे चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. जैश ए महंमद आणि लष्करे तैयबा या संघटनांचे पाच दहशतवादी ऑपरेशन सिंदूरमध्ये मारले गेल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.

दोन्ही देशांमध्ये अमेरिकेने मध्यस्थी केल्याचा दावा करतानाच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी शांततेचा मार्ग निवडल्याबद्दल अभिनंदन केले आहे. भारताकडून अधिकृतपणे देण्यात आलेल्या माहितीनुसार मात्र दोन्ही देशांनी घेतलेला हा निर्णय थेट दोन्ही देशांमध्येच झालेल्या चर्चेअंती घेतल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड


Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply