आणीबाणीविरोधातील आंदोलन म्हणजे देशासाठी केलेला त्याग : खासदार नारायण राणेंनी केला सत्याग्रहींचा सन्मान

रत्नागिरी : ‘दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशहितासाठी नव्हे, तर स्वतःच्या बचावासाठी कायद्याचा आणि घटनेचा दुरुपयोग करून आणीबाणी लादली होती. तिला विरोध करताना लाखो कार्यकर्त्यांना कोणताही गुन्हा नसताना शिक्षा भोगावी लागली होती. त्या कार्यकर्त्यांनी देशासाठी केलेलं हे आंदोलन म्हणजे एक त्याग होता. अशी त्यागी माणसं देशाच्या प्रत्येक संकटात धावून आली, म्हणून देश सावरला गेला. अशा त्यागी व्यक्तींचा सन्मान माझ्या हस्ते होणं हे मी माझं भाग्य समजतो. हा कृतज्ञतेच्या भावनेतून केलेला सन्मान आहे,’ असं प्रतिपादन खासदार नारायण राणे यांनी केलं. संविधान हत्या दिनानिमित्त भारतीय जनता पक्षाने रत्नागिरीत आज आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. (फोटो, व्हिडिओ बातमीच्या शेवटी)

विवेक भावे, डॉ. संजय केतकर, दत्तात्रय रानडे, दामोदर गाडगीळ, गोपाळकृष्ण रायकर, प्रकाश आमकर, अनिरुद्ध ठाकूर, तसेच तुकाराम तोसकर, शिवराम ठीक अशा आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्या सत्याग्रहींचा या वेळी खासदार राणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

‘आणीबाणीमध्ये लोकशाही टिकवण्यासाठी अनेकांचं योगदान आहे. त्यांचं स्मरण करून लोकशाही अधिक सक्षम करणं ही काळाची गरज आहे. याकरिता या विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं,’ असं भाजप दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव या वेळी म्हणाले. या वेळी जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके, सहसंयोजक अभय चितळे, राजू भाटलेकर उपस्थित होते.

आणीबाणीविरुद्ध आवाज उठवणाऱ्या महाराष्ट्रातल्या तीन लाखांहून अधिक देशप्रेमींना, तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांना तुरुंगवास भोगावा लागला. त्यात रत्नागिरी जिल्ह्यातल्या १८० जणांचा समावेश असून, त्यापैकी काही जण आज हयात नाहीत, अशी माहिती या कार्यक्रमात देण्यात आली. इंदिरा गांधींनी आणीबाणी कशी लागू केली व तिचा भारतीयांना कसा त्रास झाला यावर आधारित ध्वनिचित्रफीत कार्यक्रमाच्या सुरुवातीला दाखवण्यात आली. आणीबाणीविषयक माहिती देणारं प्रदर्शनही या ठिकाणी मांडण्यात आलं होतं.

१९७१मध्ये केलेला मिसा कायदा, त्यानंतर न्यायालयात लागलेला निकाल व नंतर लादलेली आणीबाणी यावर डॉ. संजय केतकर यांनी विस्तृत माहिती दिली. विवेक भावे म्हणाले, की ‘आणीबाणीत तुरुंगवास भोगला. आज त्याला ५१ वर्षं होत आहेत. आणीबाणी लादल्याने त्याविरोधात निषेध करण्यासाठी पाऊल उचललं. रा. स्व. संघावर बंदी आली, त्या वेळी सावंतवाडी, कुडाळपर्यंत २० हजार पत्रकं जिल्ह्यात पोहोचवली जात होती. तुरुंगात झाडपाल्याची आमटी दिली जायची. त्यामुळे सर्वांना उष्णतेचा त्रास झाला. त्यामुळे शहरातून ताकाचे कॅन तुरुंगात आणून दिले जात होते. ढेकणांचा त्रासही सहन केला. न्यायालयात हजर केलं असता कॉंग्रेसचे कट्टर कार्यकर्ते अॅड. नानासाहेब पंडित हे आमच्या बाजूने उभे राहिले. भारतमाता की जय अशा घोषणा देणे देशविरोधी नाही, पाच जणांनी एकत्र येऊ नये, असं न्यायालयाने सांगितलं व आमची मुक्तता करण्यात आली.’

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply