आगाशे विद्यामंदिरात योगदिन साजरा; विद्यार्थी-पालक-शिक्षकांनी केला योगसराव

रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाच्या कृ. चिं. आगाशे प्राथमिक विद्यामंदिरात आज आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त विशेष योगसत्राचे आयोजन करण्यात आले होते. रविवारचा सुट्टीचा दिवस असूनही अनेक विद्यार्थी आणि पालकांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहून योगासनांचे धडे गिरवले. राष्ट्रीय योगपटू आणि योगप्रशिक्षक दूर्वांकुर चाळके यांनी विद्यार्थी आणि पालकांना योगासनांची प्रात्यक्षिके दाखवून त्यांच्याकडून करून घेतली. या कार्यक्रमात प्रबंधक विनायक हातखंबकर, मुख्याध्यापिका प्राजक्ता कदम, ज्येष्ठ शिक्षिका गीता सावंत यांच्यासह अन्य शिक्षक-शिक्षिकांनीही सहभागी होऊन योगासने केली. (फोटो आणि व्हिडिओ शेवटी दिला आहे.)
सुरुवातीला वॉर्म-अप झाल्यानंतर सूर्यनमस्कार घालण्यात आले. त्यानंतर वृक्षासन, ताडासन, त्रिकोणासन, अर्धउष्ट्रासन, वज्रासन, मार्जारासन, मकरासन, पश्चिमोत्तानासन, सेतुबंधासन अशी अनेक आसने करण्यात आली. सर्वांत शेवटी शवासन झाल्यानंतर विविध प्रकारचे प्राणायाम करण्यात आले. त्यात अनुलोम-विलोम, कपालभाती, भ्रामरी आदींचा समावेश होता. शेवटी हास्ययोगाची प्रात्यक्षिकेही करण्यात आली. प्रार्थनेने योगसत्राची सांगता झाली. शाळेच्या वेळापत्रकातही योगासनांच्या तासिकेचा समावेश केला जाणार असून, त्या माध्यमातून मुलांकडून योगसराव करून घेतला जाणार आहे.

जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी मलिनाथ कांबळे हेही या कार्यक्रमात मुलांचे पालक या नात्याने सहभागी झाले होते. त्यांच्या पत्नी सौ. कांबळे यांनी नियमित योगासने केल्यामुळे स्वतःला झालेल्या शारीरिक फायद्यांबद्दलचे अनुभव सांगितले आणि सर्व पालकांनाही नियमितपणे योगासने करण्याचे आवाहन केले. योगसाधक मधुरा कुलकर्णी यादेखील पालक म्हणून या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. योगासने केवळ योगदिनीच न करता ती दररोज केली पाहिजेत, असे आवाहन त्यांनी केले. तसेच, ‘निरोगी वृद्धत्वासाठी योग’ या यंदाच्या योगदिनाच्या संकल्पनेविषयी त्यांनी अधिक माहिती दिली.
प्रास्ताविकात मुख्याध्यापिका प्राजक्ता कदम यांनी आंतरराष्ट्रीय योगदिन कसा सुरू झाला, याबद्दल माहिती दिली. तसेच, योगासने-प्राणायामामुळे शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी, मनाला शांतता मिळण्यासाठी कसा उपयोग होतो, याबद्दलही विस्ताराने सांगितले. सहशिक्षक वैभव शिंदे यांनी सर्वांप्रति कृतज्ञता व्यक्त केली.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply