रत्नागिरीतील सहा जणांना शासनाचे कृषी पुरस्कार; एक जुलै रोजी होणार सन्मान

रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्यव्यवसाय विभागाने २०२३ या २०२४ वर्षांचे विविध कृषी पुरस्कार जाहीर केले आहेत. त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील सहा जणांचा समावेश आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या पुरस्कारविजेत्यांची निवड करण्यात आली आहे. कक्षाधिकारी रुचिता पिंपळे यांच्या स्वाक्षरीने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांचा (पती व पत्नी दोघांचा) एक जुलै रोजी कृषी दिनी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते सन्मान होणार आहे.

पुरस्कारविजेत्यांची नावे
२०२३ –
वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार (ठाणे विभाग) – डॉ. शैलेश सुभाषचंद्र शिंदेदेसाई, मु. पो. ओणी, ता. राजापूर. (एक लाख २० हजार रुपये, स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्र)
वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट) – अनंत बाबाजी खांबे, मु. पो. मांडकी, ता. चिपळूण. (४४ हजार रुपये, स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्र)
२०२४
वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार (ठाणे विभाग) – आनंद जयंत देसाई, मु. पो. पावस, ता. रत्नागिरी. (दोन लाख रुपये, स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्र)
वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार (ठाणे विभाग) – मेहरून हमीद नाकाडे, मु. पो. नेवरे, ता. रत्नागिरी. (एक लाख २० हजार रुपये, स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्र)
उद्यानपंडित पुरस्कार (ठाणे विभाग) धनंजय श्रीकृष्ण केतकर, मु. पो. भिले, ता. चिपळूण. (एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्र)
वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट) – दयानंद बाबाजी चौगुले, मु. पो. खरवते गावठाणवाडी, ता. राजापूर. (४४ हजार रुपये, स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्र)

डॉ. शिंदे-देसाई यांनी दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी मिळविली असून त्यांनी कृषीउद्यमशीलतेवर लिहिलेले पुस्तक जर्मनीत प्रकाशित झाले आहे. त्यांचे कृषीविषयक अनेक शोधनिबंध देश-विदेशात प्रसिद्ध झाले आहेत. त्यामध्ये राष्ट्रीय स्तरावरील चार सेमिनारमध्ये सादर केलेल्या शोधनिबंधांचा समावेश आहे. याशिवाय अनेक चर्चासत्रे आणि कार्यशाळांमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे. शेतकऱ्यांसाठी त्यांनी विविध स्तरावर ३०० पेक्षा अधिक व्याख्याने दिली असून काजू आणि काजूप्रक्रिया उद्योगाबाबत त्यांचे अनेक लेख आणि बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. ओणी येथे त्यांनी सावली कृषी पर्यटन केंद्र, श्री अॅग्रो सर्व्हिसेस अँड कन्सल्टन्सी, श्री काजू प्रक्रिया उद्योग, श्री नर्सरी शेतकरी प्रशिक्षण केंद्र, सरसेनापती मल्हारराव होळकर बंदिस्त शेळीपालन, गीर पालन इत्यादी उपक्रम सुरू केले आहेत. आंबा, काजू आणि बांबूची लागवड ही त्यांनी सुमारे १७ एकर क्षेत्रात केली आहे. त्यामार्फत त्यांनी अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. ग्रामीण भागातील युवक, शेतकरी तसेच महिला बचत गटांना ते सतत मार्गदर्शन करत असतात.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply