जलतरणपटू, प्रशिक्षक, माजी सैनिक शंकरराव मिलके यांचे निधन

रत्नागिरी : माजी सैनिक राष्ट्रीय जलतरणपटू, जलतरण प्रशिक्षक शंकरराव मिलके (वय ८६) यांचे अल्पशा आजाराने पुण्यातील रुग्णालयात आज, दि. २२ जून रोजी दुपारी निधन झाले.

मेंदूच्या विकारामुळे ते गेले १५ दिवस पुण्याच्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

शंकरराव मिलके मूळचे नूल (गडहिंग्लज, कोल्हापूर) येथील रहिवासी होते. ते १९६२ मध्ये भारतीय सैन्यात भरती झाले. त्यांनी कारगिल युद्धापर्यंत देशसेवा बजावली. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी रत्नागिरीत स्थायिक होऊन मुलांमधील समुद्राची भीती घालवण्यासाठी पोहण्याचे मोफत प्रशिक्षण देण्याचा उपक्रम सुरू केला. विद्यार्थ्यांसह मोठ्या व्यक्तींनाही त्यांनी पोहायला शिकवले होते. त्यांचे विद्यार्थी जलतरण स्पर्धांमध्ये यश मिळवत आहेत. ते स्वतःही उत्तम जलतरणपटू होते. वयाच्या ८० व्या वर्षीही त्यांनी राष्ट्रीय मास्टर्स जलतरण स्पर्धेत सुवर्ण व रौप्यपदके पटकावून रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. त्यांना उत्कृष्ट जलतरणपटू म्हणून सद्भावना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मिलके यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली व नातवंडे असा परिवार आहे.

मिलके सरांविषयी …

गोळप कट्टाच्या ५४व्या कार्यक्रमात २० एप्रिल २०२४ मध्ये शंकरराव मिलके यांची मुलाखत सौ. आदिती काळे यांनी घेतली होती. त्यावेळी त्यांनी स्वतःविषयी सांगितले ते असे –

माझे गाव कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यात.. घरी शेती होती. ग्रामीण भाग त्यामुळे कसल्या सोयी नव्हत्या. लहानपणापासून शेतीची कामे करण्याची आवड. त्या काळात प्रौढ शिक्षण वर्ग शासनाने काढलेले होते. तिथे एकदा गेलो असताना शिक्षक “डोळे असून आंधळे” अशी गोष्ट सांगत होते. शिक्षण नसेल तर सगळे व्यर्थ आहे असा गोष्टीचा अर्थ होता. त्याचा प्रभाव पडला. शिकावे असे वाटायला लागले. दिवसा काम करून रात्री प्रौढ साक्षर वर्गात सहा महिन्यांत एक इयत्ता असे दोन वर्षांत चौथीपर्यंत शिकलो. तेवढेच माझे शिक्षण!

स्वातंत्र्य मिळाल्याने सगळीकडे स्वातंत्र्यसैनिकांबद्दल चर्चा सुरू असायच्या. त्यामुळे आपणसुद्धा देशासाठी काही केले पाहिजे असे वाटायचे. १९६० ला गोवा स्वतंत्र झाला. त्यावेळी देशाचे सैनिक आमच्या गावाजवळून वाहनाने गोव्यात जात असत. ते सैनिक त्यांचा रुबाब पाहून सैनिक व्हावे, असे वाटू लागले. १९६२ मध्ये सैन्यात भरती झालो. त्यानंतर जबलपूरला ट्रेनिंग होते. मला वायरलेस सिग्नल आणि ड्रायव्हरचे काम होते. चौथी पास असल्याने हिंदी. इंग्रजी येत नव्हते. ट्रेनिंग सुरू असताना रात्री जागून हिंदी आणि रोमन हिंदी शिकलो. ट्रेनिंग सुरू असताना पोहणे आणि सर्व खेळात भाग घेत असे. १९६४ ला पंजाबमध्ये पोस्टिंग मिळाले. १९६५ ला भारत पाकिस्तान युद्धात सहभाग होता. मी कमांडर यांची गाडी चालक, वायरलेस आणि संदेशवहन काम करत असे. आम्ही सिग्नल दिल्यावर बाकी सैन्य पुढे सरकत असे. आव्हानात्मक काम होते. कमांडर पंजाबी सुरजित सिंग (गुरदयाल सिंग) होते. ते मला मिल्खासिंग म्हणत असत.. अमेरिकेने पाकिस्तानला दिलेले १८५ पॅटन रणगाडे युद्धात आमच्या सैन्याने उद्ध्वस्त केले. आम्ही लाहोरपर्यंत पुढे गेलो होतो. मात्र पुढे जाऊ नका, असा आदेश आल्याने थांबलो. माझी राष्ट्रपती पदकासाठी शिफारस होती. मात्र माझे नाव पुढे पाठवले गेले नाही, हे कळल्यावर मला कमांडर यांनी विशेष शिफारस करून ज्येष्ठता डावलून मला कनिष्ठ असतानाही टेक्निकल क्लास वन ऑफिसर ही पदवी दिली.

१९७१ च्या युद्धातसुद्धा सहभागी होता आले. त्यावेळी बांग्लादेश निर्मिती भारताने करून दिली. मात्र पूर्व आणि पश्चिम दोन्ही आघाड्यांवर युद्ध झाले. हे युद्ध अमेरिकेने पाकिस्तानवर लादले होते. त्याशिवाय अमेरिकेचे प्रसिद्ध सातवे आरमार मदतीसाठी पाठवले होते. असे असतानाही भारताने युद्धात विजय मिळवला.

सैन्यात पंधरा वर्षे सेवा करून १९७७ ला निवृत्ती घेतली. त्यानंतर एसटीमध्ये कोल्हापूर, महाड आणि रत्नागिरी डेपोत ड्रायव्हरची नोकरी केली. रत्नागिरीत असताना किनाऱ्यावर फिरताना मुले, नागरिक समुद्राला घाबरतात असे लक्षात आले. ही भीती घालवायची असे ठरवले. त्यासाठी अनेक वर्षे समुद्राचा अभ्यास केला. भरती,ओहोटी, लाटा, भोवरे, पाणी सगळ्याचा अभ्यास केला. त्यासाठी फिशरीज कॉलेज, नेव्ही, तटरक्षक दल, मच्छिमार या सगळ्यांकडे जाऊन परिपूर्ण माहिती घेतली. प्रथम माझा लहान मुलगा, मुलगी यांना समुद्रात पोहायला शिकवायला सुरुवात केली. विविध समुद्रातील स्पर्धांमध्ये मुलांना भाग घ्यायला लावून सुरुवात केली. त्यानंतर प्रसिद्धी झाल्याने लोकाग्रहास्तव १९८४ पासून नर्मदा जेटीवर मुलांना, मोठ्या माणसांना समुद्रात पोहायला शिकवायला सुरुवात केली. आजपर्यंत पूर्ण महाराष्ट्रातील २५००० पेक्षा जास्त लोकांना पोहायला शिकवले.

घरातील मुले, नातवंडे सगळी पट्टीचे पोहतात. माझ्या नातवाला अकराव्या महिन्यात समुद्रात टाकले होते. रत्नागिरीतील अनेक वकील, सीए, डॉक्टर यांची कुटुंबे, तटरक्षक दल, फिशरीज कॉलेजची मुले-मुली, पोलीस, न्यायाधीश इत्यादी असंख्य लोकांना पोहायला शिकवता आले. बाहेरची अनेक मंडळी रत्नागिरीत लॉजवर राहून माझ्याकडे पोहायला शिकायची. चाळीस वर्षे समुद्रात पोहायला शिकवत आहे.

समुद्रात पोहायच्या स्पर्धा रत्नागिरीत पहिल्यांदा सुरू केल्या. समुद्र आपल्याला बुडवत नाही. माझ्यापर्यंत या, न बुडता पोहता येईल याची गॅरंटी माझी, असे मी आवर्जून सांगतो. आज ८४ वय आहे. अनेक पोहण्याच्या स्पर्धात भाग घेऊन बक्षिसे मिळवली. आज माझा मुलगा, मुलगी पोहायला शिकवतात. नातवंडे राज्य स्पर्धात बक्षिसे मिळवतात. माझ्या जीवनात समाधानी आहे.

०००००००

याशिवाय मिलके सरांनी त्यांनी ६५ आणि ७१ च्या युद्धातील अनेक प्रसंग, आठवणी आणि घटना यांचे वर्णन करताना श्रोत्यांना प्रत्यक्ष यूद्धभूमीवर असल्याचा रोमांचकारी अनुभव दिला. १९६५चे युद्ध का थांबवले, याबाबतचे मत सांगितले. १९६४ला शास्त्रीजींनी देशाची परिस्थिती बिकट असताना जनतेला सोने दान करण्याचे आवाहन केले होते. लोकांनी एक-दोन ग्रॅमपासून सोने दान केले. आमदार-खासदारांनी खूप मोठे सोने दान केले होते. पूर्ण भारतातील सगळ्या राज्यांमधून लोकांनी सोने दान केल्याने तिजोरीत अनेक टन सोने जमा झाले. ते वितळवून त्याच्या विटा बनवून भारताचा शिक्का मारून ते सोने जागतिक बँकेत ठेवून त्यातून कर्ज घेतले. त्यातून शस्त्रास्त्र खरेदी आणि बाकी प्रगती देशाला करता आली, असे त्यांनी सांगितले.

१९७५ च्या आणीबाणीत आलेल्या वॉरंटबाबतचा प्रसंग त्यांनी सांगितला. सैन्यातील शिस्त, जीवनातील शिस्त तसेच स्वातंत्र्याचे महत्त्व कोणाला कळले नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. आयुष्यात पत्नीची साथ मोलाची होती. त्यामुळे हा सगळा प्रवास घडल्याचेही मिलके सर म्हणाले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply