Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

एसटीने पावणेदहा लाख भाविकांना घडवले विठ्ठल दर्शन

Advertisements

मुंबई : आषाढी एकादशी यात्रेनिमित्त ५२०० जादा बसेसच्या माध्यमातून एसटीने तब्बल ९ लाख ७१ हजार ६८३ भाविक-प्रवाशांची सुरक्षित ने-आण करून त्यांना विठ्ठल दर्शन घडवले आहे. या सेवेतून एसटीला ३५ कोटी ८७ लाख ६१ हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे. परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली.
सरनाईक म्हणाले, की आषाढी यात्रेनिमित्त अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठूरायाच्या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून श्रीक्षेत्र पंढरपूर येथे मोठ्या संख्येने भाविक-प्रवाशी येत असतात. या भाविक-प्रवाशांना त्यांच्या गावापासून पंढरपूरपर्यंत ने-आण करण्यासाठी एसटीने तब्बल ५२०० जादा बसेस सोडल्या होत्या. ३ ते १० जुलैदरम्यान या बसेसनी २१ हजार ४९९ फेऱ्या करून तब्बल ९ लाख ७१ हजार ६८३ प्रवाशांची सुरक्षित ने-आण केली आहे. यातून एसटी महामंडळाला ३५ कोटी ८७ लाख ६१ हजार रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे. ते मागील वर्षी मिळालेल्या उत्पन्नापेक्षा ६ कोटी ९६ लाख ३ हजार रुपयांनी जास्त आहे. २०२४ साली आषाढी यात्रेचे एकूण उत्पन्न २८ कोटी ९१ लाख ५८ हजार रुपये इतके होते. अर्थात, एवढे चांगले उत्पन्न आणून लाखो भाविकांना सुखरूप देवदर्शन घडवून आणणारे हजारो चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचारी व त्यांना मार्गदर्शन करणारे पर्यवेक्षक आणि अधिकारी अभिनंदन पात्र आहेत, असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी या वेळी केले.

हजारो एसटी कर्मचाऱ्यांना मोफत भोजन व्यवस्था
आषाढी यात्रेच्या काळामध्ये पंढरपूरमध्ये येणारे एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांची जेवणाअभावी गैरसोय होऊ नये, म्हणून परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी स्वखर्चातून ५, ६ आणि ७ जुलै रोजी मोफत जेवण, चहा-नाश्त्याची सोय केली होती. याचा फायदा हजारो एसटी कर्मचाऱ्यांनी घेतला. याबद्दल सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी मंत्री सरनाईक यांचे आभार मानले आहेत.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version