
मुंबई : यंदा गौरी गणपती-उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमानी-प्रवाशांच्या एकेरी गट आरक्षणावरील ३० टक्के भाडेवाढ मागे घेण्यात येत असल्याची घोषणा परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार आणि मुंबईतील चाकरमान्यांच्या भावना लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
मंत्री सरनाईक म्हणाले, की ‘महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) गेल्या ७७ वर्षांपेक्षा जास्त काळ महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला सुरक्षित आणि किफायतशीर प्रवासी सेवा देत आले आहे. महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेला फायदा-तोट्याचा विचार न करता दैनंदिन प्रवासाबरोबरच सण, यात्रा, उत्सव, लग्नकार्य यासाठी एसटी वेळेवर उपलब्ध करून दिली जाते. विशेषतः गणपती उत्सव, आषाढी यात्रा, होळीचा उत्सव यासाठी प्रवाशांच्या मागणीनुसार गट आरक्षणासाठी मोठ्या प्रमाणात बसेस उपलब्ध करून दिल्या जातात. यंदादेखील मुंबई व उपनगरातील चाकरमानी-प्रवाशांच्या मागणीनुसार, तब्बल ५ हजार जादा एसटी बसेस गणपती उत्सवासाठी सोडण्याचे नियोजन एसटीने केली आहे. विशेष म्हणजे त्यामध्ये शासनाने दिलेल्या अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी असलेल्या सर्व सवलती लागू असतात. तथापि, प्रवासी केवळ एकेरी आरक्षण करीत असल्यामुळे परतीच्या प्रवासात एसटी बस मोकळ्या आणाव्या लागतात. त्याचा प्रचंड मोठा आर्थिक फटका एसटीला बसतो. सण-उत्सवासाठी राज्यभरातील इतर ठिकाणाहून बसेस एकत्रित करून प्रवाशांना उपलब्ध करून दिलेल्या असतात. त्यामुळे स्थानिक पातळीवर बसेसची कमतरता निर्माण होते. हे लक्षात घेता हा तोटा आणखी वाढू शकतो! तो काही प्रमाणात कमी करण्यासाठी एकेरी गट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांच्या तिकिटावर ३० टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय महामंडळाने नाईलाजाने घेतला होता. परंतु, उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार, तसेच मुंबई व उपनगरातील मराठी चाकरमान्यांच्या भावना लक्षात घेता, यंदा एकेरी गट आरक्षणावरील ३० भाडेवाढ रद्द करण्यात येत आहे. (उर्वरित बातमी जाहिरातीच्या खाली)
उत्सवकाळात एसटीचे भाडे खासगी बसेसच्या तुलनेत अत्यल्प
गणपती उत्सव, मुंबईचे चाकरमानी आणि एसटी यांचे एक अतूट नाते आहे. कोकणी माणसाचे एसटीवर प्रचंड प्रेम आणि विश्वास आहे. त्यामुळे तोटा सहन करूनदेखील एसटी गणपती उत्सव, दिवाळी, होळी यांसारख्या उत्सवकाळात चाकरमान्यांना नेहमीच प्रवासी सेवा देत आली आहे. यापुढेही देत राहील! परंतु, चाकरमानी-प्रवाशांनीदेखील एसटीच्या आर्थिक परिस्थितीचा गांभीर्याने विचार करावा! कारण सध्या उत्सव काळामध्ये खासगी बसेस भरमसाट भाडेवाढ करतात. त्यांच्या वाढत्या तिकीट दराच्या तुलनेमध्ये एसटीचे तिकीट दर हे अत्यंत कमी आहेत. त्यामुळे भविष्यात एसटीने तत्कालीन दरवाढ केल्यास प्रवाशांनी त्याला सहकार्य करावे, असे आवाहन परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री. प्रताप सरनाईक यांनी केले आहे.
मागील वर्षी ११.६८ कोटी रुपये नुकसान
मागील वर्षी एसटी महामंडळाने गणपती उत्सवासाठी जाताना ४३३० बसेस व परतीच्या प्रवासासाठी ११०४ बसेस उपलब्ध करून दिल्या होत्या. तथापि, एकेरी गटआरक्षणामुळे गणपती उत्सवाच्या काळामध्ये प्रवाशांना कोकणात त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवून रिकाम्या बसेस परत आणाव्या लागल्या. तसेच त्यांना परतीच्या प्रवासासाठीदेखील बसेस उपलब्ध करून देताना रिकाम्या बसेस राज्याच्या विविध भागांतून कोकणात पाठवाव्या लागल्या. त्यामुळे इंधनखर्च, चालक-वाहकांचे वेतन, अतिकालीन भत्ता याचा प्रचंड मोठा आर्थिक बोजा एसटीवर पडला. यातून गणपती उत्सवाच्या काळामध्ये मिळालेल्या उत्पन्नामध्ये तब्बल ११ कोटी ६८ लाख रुपये तोटा महामंडळाला सहन करावा लागला. यंदा पाच हजार बसेस सोडण्याचे नियोजन आहे. त्यामुळे या सर्व बसेस एकेरी गट आरक्षणासाठी आरक्षित झाल्यास हा तोटा १३ ते १६ कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

