शिस्तबद्ध आणि स्वच्छ कारभारासाठी प्रसिद्ध असलेले ॲड. दीपक पटवर्धन राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष

रत्नागिरी : राज्यातील सर्व पतसंस्थांची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी रत्नागिरीचे सुपुत्र आणि स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांची आज (१२ जून) बिनविरोध निवड झाली. त्यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरीतील स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्था अत्यंत शिस्तबद्ध आणि पारदर्शक कारभार करून सातत्यपूर्ण उत्तुंग कामगिरी पतसंस्था म्हणून नावारूपाला आली आहे. असे सक्षम आणि स्वच्छ प्रतिमा असलेले नेतृत्व आता राज्यातील १९ हजार पतसंस्थांच्या शिखर संस्थेला लाभल्याने सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे यांनी ॲड. पटवर्धन यांचे अभिनंदन करताना सध्याच्या आर्थिक परिस्थितीवर भाष्य केले. ‘युद्धजन्य परिस्थिती आणि इंधनाच्या वाढत्या दरांमुळे अर्थव्यवस्थेसमोर आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली असून, त्याचा परिणाम पतसंस्था क्षेत्रावरही होत आहे. अशा काळात राज्यभरातील सुमारे १९ हजार पतसंस्थांना योग्य मार्गदर्शन आणि सक्षम नेतृत्व मिळाले आहे,’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली. निवड प्रक्रियेवेळी पतसंस्था फेडरेशनचे मुख्य प्रवर्तक वसंतराव शिंदे, माजी अध्यक्ष काकासाहेब कोयटे, उपाध्यक्ष डॉ. शांतिलाल शिंगी, महासचिव श्री. राजोबा, ज्येष्ठ संचालक दादाराव तुपकर यांच्यासह राज्यभरातील सर्व संचालक उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार किरण सामंत, मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आणि आमदार प्रवीण दरेकर, सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. उदय जोशी, तसेच आमदार प्रसाद लाड यांनी ॲड. दीपक पटवर्धन यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply