दापोली : साहित्य, संस्कृती आणि सामाजिक जाणिवांचा सुरेख संगम घडवणारे ज्येष्ठ साहित्यिक इक्बाल मुकादम यांना पहिला ‘पंडित खावर’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
बदीउज्जमा खावर यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने हा पुरस्कार देण्यात येणार आहे. साहित्य क्षेत्रात अनेक दशकांपासून सातत्याने सुरू असलेल्या श्री. मुकादम यांच्या अभ्यासपूर्ण आणि संवेदनशील लेखनाचा गौरव म्हणून हा पुरस्कार देण्यात आला आहे.
दापोलीमधील ‘जागरण’ सामाजिक संस्थेने यावर्षीपासूनच साहित्य क्षेत्रातील कर्तबगारीकरिता हा पुरस्कार जाहीर केला आहे. शहरातील पद्मसाई सभागृहात झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्याला तालुक्यातील अनेक साहित्यप्रेमी रसिक वाचक उपस्थित होते. दापोली अर्बन बँकेचे चेअरमन डॉ. जयवंत जालगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्याच हस्ते इक्बाल मुकादम यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
समाजातील सामान्य माणसाच्या भावविश्वाला शब्दबद्ध करताना मानवी मूल्यांची जपणूक करणारे लेखन ही इक्बाल मुकादम यांच्या साहित्याची खरी ओळख मानली जाते. त्यांच्या लेखणीतून ग्रामीण जीवन, सामाजिक व्यवस्था, माणसांमधील नात्यांची ऊब आणि काळाच्या बदलत्या प्रवाहातील वास्तव अत्यंत प्रभावीपणे समोर आले आहे. त्यामुळेच वाचकांच्या मनात त्यांनी एक स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे.
साहित्य हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून समाजप्रबोधनाचे प्रभावी साधन आहे, ही भूमिका जपणाऱ्या साहित्यिकांचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा पुरस्कार सुरू करण्यात आल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
पुरस्कार स्वीकारताना इक्बाल मुकादम यांनी साहित्यिक प्रवासातील आठवणींना उजाळा देत, ‘लेखन ही केवळ अभिव्यक्ती नसून समाजाशी प्रामाणिक राहण्याची जबाबदारी आहे,’ असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी जागरण सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष मंगेश मोरे, प्राचार्य डॉ. अशोक निर्बाण, पत्रकार मुश्ताक खान, जालगावचे सरपंच अक्षय फाटक, नगरसेविका सौ. रिया सावंत, माजी नगरसेवक सचिन गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पांगारकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्याचे औचित्य साधून दापोली स्थित नामवंत आणि प्रतिथयश कवींचे ‘रंगधारा’ हे कविसंमेलन पार पडले. त्यामध्ये कवी कैलास गांधी, सुदेश मालवणकर, सुनील कदम, सचिन चव्हाण, रेखा जगलकर, सुशांत रिसबूड या प्रतिथयश कवींनी आपल्या रचना सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
Follow Kokan Media on Social Media

