माझी कविता मालवणी मातीतच रुजलेली! – रुजारिओ पिंटो

मालवण : माझी मालवणी कविता मालवणी मातीतच रुजून आली. म्हणूनच तिच्यात मालवणी माणसांची सुखदुःखे, त्यांचा इरसालपणा दिसून येतो. दारिद्र्यातही विचारांची श्रीमंती देणारी माझी आई माझ्या प्रत्येक कवितेची मूलस्रोत आहे, असे उद्गार मालवणी ज्येष्ठ कवी रुजारिओ पिंटो यांनी काढले.

कोकण मराठी साहित्य परिषदेची मालवण शाखा आणि साने गुरुजी कथामालेची मालवण शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ही मालवणी मुलाखत घेण्यात आली. कोमसाप मालवण शाखेचे अध्यक्ष सुरेश शामराव ठाकूर यांनी ही मुलाखत घेतली. आचरे येथील मातोश्री मंगल कार्यालयाच्या सभागृहात मालवणी भाषेचो कंठो! रुजारिओ पिंटो! या सदराखाली ही प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली होती. ठाकूर यांच्या इरसाल मालवणी प्रश्नांना कवी रुजारिओ पिंटो यांनी तेवढ्याच खुमासदार मालवणीने उत्तर देऊन मुलाखतीत रंगत आणली.

घर सगळा गळता
चाय चुलीवरच जळता
सारे सुखात जेवतत
आमची भांडी पेवतत

हे चरण म्हणजे माझ्या बालपणाचा बोलपट होय, असे श्री. पिंटो यांनी यावेळी सांगितले. मी कसा घडलो हे सांगत असताना ते काही काळ आईच्या आठवणीने भावनाविवश झाले. महाविद्यालयीन शिक्षण घेता आले नाही, तरी आता माझ्या मालवणी कविता मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात बोलीभाषा म्हणून निवडल्या गेल्या आहेत. माझ्या कवितांना ज्यावेळी पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर प्रभृतींकडून गौरविले जाते, त्यावेळी झालेले आंतरिक समाधान मला शब्दांत व्यक्त करता येत नाही, असेही ते म्हणाले.

त्यांनी माऊली (मराठी), दर्यादेगर (कोकणी ), आम्ही मालवणी (मालवणी), गरो फणसाचो (मालवणी) आदी काही कवितांची उगमस्थाने सांगितली. त्यांनी सादर केलेल्या शालग्या आणि कायच कळना नाय या मालवणी कवितांनी रसिकांना मनमुराद हसविले. कोकण मराठी साहित्य परिषदेपासून राष्ट्रीय साहित्य अकादमी, कोकणी सभा आदी विविध बारा समित्यांवर काम करीत असताना आलेले अनुभव आपल्या मुलाखतीत श्री. पिंटो यांनी कथन केले. कोकणीनंतर हिंदी भाषेत त्यांचा मेरी माँ हा कवितासंग्रह लवकरच येत आहे. चार भाषांत कविता करणारा महाराष्ट्रातील एकमेव कवी म्हणून ठाकूर यांनी त्यांचे अभिनंदन केले.

कोमसापची ही पहिलीच मालवणी मुलाखत चिरस्मरणीय ठरली. यावेळी कोमसाप आणि साने गुरुजी कथामालेच्या आजीव सदस्यांसह इतर बहुसंख्य रसिक उपस्थित होते.

प्रारंभी विजयदुर्गच्या मालवणी कवयित्री सुनंदा कांबळे यांनी पिंटो यांचे स्वागत करून त्यांची मालवणीतून आगळीवेगळी ओळख करून दिली.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply