कोकणातील निसर्ग व जैवविविधतेवर विद्यार्थ्यांनी संशोधन करावे: पालकमंत्री डॉ. उदय सामंत

कोकणातल्या वनसंपदेवर संशोधनासाठी अभ्यासक्रमाला आवश्यक निधी देण्याची उदय सामंत यांची ग्वाही

रत्नागिरी : ‘कोकणातला निसर्ग, जैवविविधता आणि स्थानिक वनसंपदेवर विद्यार्थ्यांनी सखोल संशोधन करणं गरजेचं आहे. अशा अभ्यासासाठी संस्थांनी पुढाकार घेऊन स्वतंत्र अभ्यासक्रम सुरू केल्यास त्यांना जिल्हा नियोजन समिती, तसंच सिंधुरत्न योजनेतून आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल,’ अशी ग्वाही उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली. रत्नागिरीच्या खेड तालुक्यातल्या सातवीणगाव इथे वनविभागाने उभारलेल्या निसर्ग माहिती केंद्राचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झालं. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने वडपूजनाने झाली. या वेळी विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई, प्रांताधिकारी वैशाली पाटील, सहायक वनसंरक्षक प्रियांका लगड यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

या केंद्रामुळे नागरिक आणि पर्यटकांना जैवविविधतेची माहिती मिळेल, तसंच संशोधनाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला. हे केंद्र केवळ पर्यटनापुरतं मर्यादित न राहता ते प्रत्यक्ष शिकवणारं आणि संशोधनाला गती देणारं केंद्र व्हावं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ‘सह्याद्रीच्या खोऱ्यात असलेल्या पट्टेरी वाघ, बिबट्या, ब्लॅक पँथर यांसारख्या वन्यजीवांची वैशिष्ट्यं, त्यांची भ्रमणक्षमता, अधिवास यामागे असलेलं मोठं विज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. कोकणातल्या निसर्गरम्य परिसरावर उच्च दर्जाचं संशोधन होऊ शकतं. रत्नागिरीच्या वनसंपदेचा व वन्यजीवांचा शास्त्रीय अभ्यास करण्याची मोठी संधी विद्यार्थ्यांसमोर आहे,’ असं सामंत म्हणाले.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply