रत्नागिरी : शून्याच्या आसपास तापमान असलेलं प्रतिकूल हवामान, ३२.५ किलोमीटरचा खडतर चढ आणि त्यानंतरचे डोंगराळ रस्ते अशी अत्यंत आव्हानात्मक असलेली लडाखमधली खार्दुंग ला चॅलेंज स्पर्धा रत्नागिरीतले धावपटू प्रसाद देवस्थळी यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केली. अशी कामगिरी करणारे ते रत्नागिरीतले पहिले धावपटू ठरले आहेत. खार्दुंग गावातून लेहपर्यंतचं ७२ किलोमीटरचं अंतर १४ तासांच्या निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचं आव्हान स्पर्धकांसमोर होतं. विविध कठीण निकषांद्वारे पात्र ठरलेल्या सुमारे ३२५ धावपटूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. अत्यंत अवघड परिस्थितीमुळे अनेकांना हे आव्हान पूर्ण करता आलं नाही; मात्र प्रसाद देवस्थळी यांनी जिद्दीने ही स्पर्धा पूर्ण केली.
देवस्थळी रत्नागिरीत कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन आणि गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉन या स्पर्धांचं आयोजन करतात. 'केवळ स्पर्धांचं आयोजन न करता स्वतःही अशा कठीण स्पर्धांमध्ये सहभागी झाल्यास धावपटूंना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो, त्यांच्या नेमक्या गरजा काय आहेत, हे प्रत्यक्ष अनुभवता येतं. त्यातून भविष्यात अधिक चांगल्या पद्धतीने स्पर्धांचं आयोजन करता येतं,' असे देवस्थळी म्हणाले. कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन आणि गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉनचा प्रचार-प्रसारही या दरम्यान करण्यात आला. खार्दुंग ला चॅलेंज स्पर्धेचे आयोजक पद्मश्री चेवांग मोटुप गोबा यांना रत्नागिरीतल्या कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनसाठी आमंत्रित करण्यात आल्याचंही देवस्थळी यांनी सांगितलं. 'या स्पर्धेमध्ये शारीरिक क्षमतेपेक्षा इच्छाशक्ती, जिद्द, काटकपणा आणि आत्मविश्वास यांची खरी परीक्षा होती. प्रत्येक पावलावर मन सांगत होतं, की आता थांबावं, सोडून द्यावं; पण पुढचं पाऊल टाकत राहणं हाच एकमेव पर्याय होता. इथे येऊन धावायचं असेल तर केवळ प्रॅक्टिस पुरेशी नाही. उंचीशी आणि वातावरणाशी एकरूप होण्यासाठी जुळवून घेणं आणि शेवटपर्यंत हिंमत न हरण्याची मानसिकता अत्यंत महत्त्वाची आहे,' असं प्रसाद देवस्थळी यांनी सांगितलं.
मार्गदर्शन करणारे कोच दादा सत्रे यांचे देवस्थळी यांनी विशेष आभार मानले. तसंच कुटुंबीय, कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन फॅमिली आणि रत्नागिरी सायकलिस्ट क्लब फॅमिली यांच्याप्रति त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
देवस्थळी म्हणाले, 'शिमगोत्सवाच्या काळात आपल्या प्रथा-परंपरा जपण्यासाठी मानकरी, खुंबदार आणि ग्रामस्थ दहा-दहा, बारा-बारा दिवस पालखी घेऊन चालत राहतात. माझ्या धामापूर गावातील आई नवसरी देवी आणि वाघजाई देवीच्या पालख्या वाडी-वाडीतून फिरत असतात. त्या पालख्यांबरोबर चालणारे आपले मानकरी, खुंबदार आणि ग्रामस्थ प्रत्येक क्षणी माझ्या डोळ्यांसमोर होते. त्यांच्या जिद्दीचा विचार करून ७२ किलोमीटरचं अंतर पूर्ण करण्याची प्रेरणा मिळाली. त्यामुळे ही संपूर्ण धाव आणि हे मेडल कोकणच्या शिमगोत्सवाच्या पारंपरिक पद्धती जपणाऱ्या सर्व मानकरी, खुंबदार आणि ग्रामस्थांना मनापासून समर्पित आहे.'
Follow Kokan Media on Social Media

