रत्नागिरी : अधिक मासानिमित्त रत्नागिरीत सुप्रसिद्ध कीर्तनकार हभप सौ. रोहिणी माने-परांजपे यांची तीन दिवस कीर्तने आयोजित करण्यात आली आहेत.
अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळ व वात्सल्य-स्नेह या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आणि जयेश मंगल पार्क तसेच खल्वायन यांच्या सौजन्याने कीर्तनरंग महोत्सवाचे विशेष आयोजन करण्यात आले आहे. जयेश मंगल पार्क (थिबा पॅलेस रोड, रत्नागिरी) येथील सभागृहात बुधवार दि. ३ जून ते ५ जून २०२६ अशी सलग तीन दिवस सायंकाळी ६ ते ९ या वेळेत रोहिणीताईंची नारदीय कीर्तने रंगणार आहेत.
हभप सौ. रोहिणी माने- परांजपे नारदीय व वारकरी कीर्तनातील आघाडीच्या कीर्तनकार आहेत. कीर्तनविश्व यू ट्यूब चॅनल, झीटीव्ही, एबीपी माझा चॅनेलवर त्यांची अनेक रसाळ व भक्तिरसपूर्ण कीर्तने सातत्याने ऐकणारे लाखो श्रोते आहेत. कीर्तनाची पक्की तालीम त्यांनी हभप कीर्तन कलाशेखर नारायणबुवा काणे (कोल्हापूर) व राष्ट्रीय कीर्तनकार हभप न. चिं. अपामार्जने यांच्याकडून घेतली आहे. वयाच्या अकराव्या वर्षापासून त्यांनी कीर्तने सादर करण्यास सुरवात केली. संगीत विशारद व एमए ( शास्त्रीय संगीत) या दोन पदव्या तसेच पुणे विद्यापीठाची एमए ( मराठी साहित्य) व कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाची बीए (कीर्तनशास्त्र) या पदव्यासुद्धा त्यांना प्राप्त आहेत. पुण्याचे प्रसिद्ध गायक व गुरू पंडित हेमंत पेंडसे यांच्याकडून त्यांनी गायनाचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले आहे. कीर्तनरत्न, कीर्तनचंद्रिका, समाज प्रबोधन क्षेत्रातील अहिंसा व कीर्तनशिरोमणी असे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
रत्नागिरीतील कीर्तनरंग महोत्सवाला ऑर्गनची साथ त्यांचे यजमान कौस्तुभ सुधाकर परांजपे करणार आहेत. ते मूळचे उंबरवाडी-कोतवडे येथील असून सध्या ते पुण्यात वास्तव्यास आहेत. गेल्या २५ वर्षांपासून अनेक कीर्तने आणि गायन कार्यक्रमांना त्यांनी साथसंगत केली असून नारदीय व वारकरी कीर्तनेसुद्धा त्यांनी अनेक ठिकाणी सादर केली आहेत. युवा कीर्तनकार, कीर्तनभूषण आणि स्वरकौस्तुभ या पदव्या त्यांना प्राप्त आहेत. तबलासाथ अमेय ज्ञानेश्वर हर्डीकर करणार आहेत. ते मूळचे सोलगाव (राजापूर) येथील सुरेश आंबेकर व तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांचे शिष्य आहेत. तबला शिक्षणातील बीए व एमए या परीक्षा ते उत्तीर्ण आहेत. आजवर अनेक नामवंत कीर्तनकार व भागवतकारांना त्यांनी एक हजाराहून अधिक कार्यक्रमांतून तबल्याची साथ केली आहे.
अधिक मासाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या कीर्तनरंग महोत्सवाला सर्व नागरिकांनी जास्तीतजास्त संख्येने उपस्थित राहून रोहिणीताईंच्या भक्तिरसपूर्ण रसाळ वाणीतील कीर्तनांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

