रत्नागिरी : दापोली तालुक्यातल्या पालगड या साने गुरुजींच्या गावी पुस्तकांचं गाव हा उपक्रम सुरू केला जाणार असून, रत्नागिरीत एक एकर क्षेत्रावर २५ कोटी रुपये खर्चून मराठी भाषा संग्रहालय उभं केलं जाणार असल्याची घोषणा मराठी भाषामंत्री डॉ. उदय सामंत यांनी केली. पुण्यानंतरचा दुसरा मोठा पुस्तक महोत्सव रत्नागिरीत सुरू केला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. रत्नागिरीत आज मराठी भाषा विभाग आढावा बैठक आणि साहित्यिकांसोबत संवाद बैठक झाली. त्या वेळी हे निर्णय घेतल्याचं सामंत यांनी सांगितलं.
या वेळी महाराष्ट्र साहित्य संस्कृती संघाचे उपाध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकृष्ण जोशी, मराठी भाषा समिती सदस्य प्रकाश देशपांडे, गजानन पाटील, प्रा. शिवराज गोपाळे, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, प्रांताधिकारी जीवन देसाई, विश्वकोश निर्मिती मंडळ तथा राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. श्यामकांत देवरे उपस्थित होते.
रत्नागिरीत एक एकरवर उभारल्या जाणार असलेल्या भाषा संग्रहालयात बोलीभाषेवर संशोधन केंद्र, पुस्तक विक्री केंद्र आणि शब्दकोश निर्मितीचं दालन असेल, असं सामंत म्हणाले. तसंच, राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा विभाग हे स्वतंत्र कार्यालय स्थापन करून, तिथे मराठी भाषा अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाणार आहे. १०० कोटी रुपये खर्चून नरिमन पॉइंटला मराठी भाषा भवन, तर ऐरोलीत ४० कोटी रुपये खर्चून संशोधन केंद्र बांधण्यात येणार आहे, अशी माहितीही सामंत यांनी दिली.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

