दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड्स मॅरेथॉनमध्ये रत्नागिरीचा झेंडा; अभिजित पड्याळ आणि प्रसाद देवस्थळींनी यशस्वीरीत्या पूर्ण केली स्पर्धा

रत्नागिरी : रत्नागिरीचे अभिजित पड्याळ आणि प्रसाद देवस्थळी यांनी आज (१४ जून) झालेली अत्यंत खडतर अशी दक्षिण आफ्रिकेतली ९० किलोमीटरची कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. डर्बन ते पीटरमॅरिट्झबर्ग दरम्यानच्या अत्यंत आव्हानात्मक मार्गावर पार पडलेल्या या स्पर्धेत अभिजित पड्याळ पहिल्यांदाच सहभागी झाले होते. त्यांनी ९ तास ५१ मिनिटांत स्पर्धा पूर्ण केली. सुवर्णसूर्य फाउंडेशनचे संस्थापक आणि रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातल्या धामापूरचे सुपुत्र प्रसाद देवस्थळी यांनी सलग दुसऱ्या वर्षी कॉम्रेड्स मॅरेथॉन पूर्ण केली. त्यांनी ही स्पर्धा ११ तास २७ मिनिटांत पूर्ण केली. जागतिक दर्जाची ही स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल या दोघांवरही अभिनंदनाचा वर्षाव होत असून, ‘त्यांची ही कामगिरी जिल्ह्यातल्या तरुणांसाठी प्रेरणादायी आहे,’ अशा शब्दांत जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनीही दोघांचं अभिनंदन केलं आहे. कॉम्रेड्स मॅरेथॉनसाठी जमलेल्या हजारो धावपटूंना रत्नागिरीत आयोजित करण्यात येणाऱ्या कोकण कोस्टल मॅरेथॉन आणि गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी निमंत्रण देण्यात आल्याचं प्रसाद देवस्थळी यांनी सांगितलं. भविष्यात जगभरातले धावपटू या स्पर्धांकडे आकर्षित होतील, असा विश्वास सुवर्णसूर्य फाउंडेशनने व्यक्त केला.

गेल्या वर्षी प्रसाद देवस्थळी यांनी एकट्याने या स्पर्धेत सहभाग घेतला होता. या वर्षी त्यांनी रत्नागिरीचे अभिजित पड्याळ यांनाही सोबत घेतलं आणि दोघांनीही जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर ही जागतिक दर्जाची स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली. दोघांच्या यशस्वी कामगिरीची माहिती कळताच रत्नागिरीत आनंदाचं वातावरण निर्माण झालं. सुवर्णसूर्य फाउंडेशन, रत्नागिरी सायकलिस्ट क्लब, टीम कोकण कोस्टल आणि टीम गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉन यांच्या वतीने दोघांचं अभिनंदन करण्यात आलं.
राज्याचे उद्योग, मराठी भाषा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रसाद देवस्थळी आणि अभिजित पड्याळ यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, “कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉनसारख्या जगप्रसिद्ध आणि अत्यंत खडतर स्पर्धेत सहभागी होऊन ती यशस्वीपणे पूर्ण करणं ही मोठी अभिमानाची बाब आहे. कोकणाच्या मातीत वाढलेल्या या दोन्ही धावपटूंनी आपल्या मेहनतीच्या बळावर आंतरराष्ट्रीय स्तरावर रत्नागिरीचं नाव उंचावलं आहे. त्यांची ही कामगिरी जिल्ह्यातल्या तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.” त्यांनी दोघांनाही जिल्ह्याच्या वतीने, तसेच वैयक्तिकरीत्या शुभेच्छा देऊन अभिनंदन केलं.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply