रत्नागिरी : ‘पतसंस्था चळवळ अधिक विश्वासार्ह आणि कार्यक्षम होण्याकरिता नियमांची काटेकोर अंमलबजावणी, संचालक मंडळाकडून डोळसपणे काम होणे आणि नेमक्या नोंदी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. त्या दृष्टीने अभ्यासपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रम तयार करून राज्यभर राबवण्याचा प्रयत्न केला जाईल,’ असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे नवे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले. आज (१३ जून) संध्याकाळी रत्नागिरी नगर वाचनालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
काल (१२ जून) पुण्यात झालेल्या निवडणूक प्रक्रियेत त्यांची या पदावर बिनविरोध निवड झाली असून, या पदावर रत्नागिरीतून निवड झालेले ते पहिलेच आहेत. अॅड. पटवर्धन अनेक वर्षे सहकार क्षेत्रात कार्यरत असून, विक्रमी कामगिरी करणाऱ्या स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष आहेत. रत्नागिरी जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचेही ते अध्यक्ष असून, सध्या ते राज्य पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष होते. आधीचे अध्यक्ष काका कोयटे यांनी राजीनामा दिल्यामुळे अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली होती. अॅड. पटवर्धन यांना १६ महिन्यांचा कार्यकाळ मिळणार आहे. पत्रकार परिषदेपूर्वी अॅड. पटवर्धन यांचा स्वरूपानंद पतसंस्थेतर्फे, तसेच जिल्हा फेडरेशनतर्फे सत्कार करण्यात आला. या वेळी पतसंस्थेचे संचालक, अधिकारी-कर्मचारी, जिल्हा फेडरेशनचे उपाध्यक्ष संतोष थेराडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

संतोष थेराडे म्हणाले, ‘पतसंस्था फेडरेशनचा अध्यक्ष होणे हे खूप मोठे आणि कठीण काम आहे. ही रत्नागिरी जिल्ह्यासाठी अभिमानाची आणि कौतुकाची गोष्ट आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे नाव पूर्ण महाराष्ट्रात सहकार चळवळीमध्ये गाजत आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. पटवर्धन यांना पतसंस्थांच्या अडचणींचे पूर्ण आकलन आहे आणि या क्षेत्रात काम करण्याची मोठी संधी त्यांच्याकडे आहे. त्यांनी पूर्ण जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातही प्रशिक्षण वर्गांमध्ये कायद्याविषयी आणि संस्थाचालक-कर्मचाऱ्यांनी कशा पद्धतीने काम करावे, यावर नेहमी मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन त्यांना हे अध्यक्षपद मिळाले आहे.’
अॅड. दीपक पटवर्धन म्हणाले, ‘आजच्या प्रगत बँकिंगच्या युगातही राज्यात १९ हजारांहून अधिक पतसंस्था कार्यरत आहेत. म्हणजेच या चळवळीवर लोकांचा प्रचंड विश्वास आहे. ती चळवळ अधिक विश्वासार्ह आणि कार्यक्षम बनवण्याच्या दृष्टीने आवश्यक ते उपक्रम राबवण्याचा माझा प्रयत्न असेल. राज्यातील सहकारी पतसंस्थांच्या प्रशिक्षणासाठी सध्या शिर्डीत चांगले केंद्र आहे; मात्र व्याप्ती वाढवण्याच्या दृष्टीने मध्यवर्ती आणि विभागवार उपकेंद्रे उभारण्याची माझी संकल्पना असून, रत्नागिरी किंवा गणपतीपुळ्यात एक मोठे कायमस्वरूपी प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा मानस आहे. पतसंस्था चळवळीत चांगले घटक स्थिरावावेत यासाठी हे सारे प्रयत्न असतील.’

‘या निवडणुकीमध्ये सर्व २१ संचालकांना उभे राहण्याची संधी होती; पण सर्वांनी मिळून बिनविरोध माझी निवड केली. गेली जवळजवळ २० वर्षे मी पतसंस्था फेडरेशनचा संचालक म्हणून कार्यरत आहे. महाराष्ट्रातील तीन हजारांपेक्षा अधिक पतसंस्था या फेडरेशनशी संलग्न आहेत. पतसंस्था चळवळीचा आवाज म्हणून या फेडरेशनकडे पाहिले जाते. पतसंस्थांचे वेगवेगळे प्रश्न, नवीन कार्यक्रम किंवा नवीन तंत्रज्ञान, या सगळ्या संदर्भात फेडरेशनने सातत्याने काम करणे अपेक्षित असते. सहकार कायद्यातील तरतुदीप्रमाणे सर्व संस्थांनी त्यांच्या संचालकांसाठी, कर्मचाऱ्यांसाठी आणि सभासदांसाठी प्रशिक्षण आयोजित करणे आवश्यक असते. फेडरेशन ही शासनमान्य प्रशिक्षण संस्था आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर विविध पद्धतीची प्रशिक्षण शिबिरे फेडरेशनच्या माध्यमातून घेतली जातात. वसुली कारवाईच्या संदर्भात प्राप्त होणारा १० चा दाखलासंस्थांना प्रदान करण्यासाठी एक वेगळी व्यवस्था फेडरेशनच्या माध्यमातून केलेली आहे. सहकार खात्याचे सहायक निबंधक दर्जाचे अधिकारी डेप्युटेशनवर या फेडरेशनमध्ये काम करतात. विशेष वसुली अधिकारी फेडरेशनच्या माध्यमातून १०१च्या दाखल्यांवर कार्यवाही करून वसुली करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत असतात. पतसंस्था चळवळीला पोषक आणि मार्गदर्शक ठरेल असे काम करणे, त्यांचे प्रश्न हिरिरीने शासन दरबारी मांडणे आणि त्याची निर्गत करून घेणे, असे काम हे फेडरेशन करते,’ असे अॅड. पटवर्धन यांनी सांगितले.
‘पतसंस्थांचे जाळे संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेले आहे. १९,९७८ नागरी आणि पगारदार पतसंस्था या फेडरेशनच्या छत्राखाली काम करतात. सुमारे सहा कोटी सभासद म्हणजेच महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या ५० टक्के नागरिक या चळवळीशी जोडलेले आहेत, इतकी ही चळवळ महत्त्वाची आहे. सध्याच्या आकडेवारीप्रमाणे ९०,५०० कोटी रुपयांच्या ठेवी या पतसंस्थांकडे जमा आहेत. १२०० कोटींचे भांडवल या चळवळीमध्ये नव्याने निर्माण होत आहे. आज प्रगत बँकिंगचे युग आहे. राष्ट्रीयीकृत बँका, अर्बन बँका, खासगी बँका आणि स्मॉल फायनान्स बँकांचे मोठे जाळे असूनही, महाराष्ट्रात १९ हजारांहून जास्त पतसंस्था कार्यरत आहेत. म्हणजेच या व्यवस्थेवर जनसामान्यांचा प्रचंड विश्वास आहे,’ असे अॅड. पटवर्धन म्हणाले.
‘कोणतीही व्यवस्था चालवण्यासाठी त्यामध्ये काम करणाऱ्या व्यक्ती विश्वासार्ह असणे आवश्यक असते. विश्वास हा केवळ वर्तनातूनच नाही, तर तुमच्या ज्ञानावर आणि माहितीवरही अवलंबून असतो. फेडरेशन ही शिखर संस्था म्हणून पतसंस्थांना एकत्र करून त्यांना मार्गदर्शन करण्याचे आणि शासन दरबारी आवश्यक परिपत्रके निघावीत यासाठी काम करत आहे. या फेडरेशनमध्ये अनेक दिग्गज संचालक काम करतात. आशियातील सर्वांत मोठ्या बुलढाणा अर्बन संस्थेचे अध्यक्ष राधेश्याम चांडक हेसुद्धा या फेडरेशनचे संचालक आहेत. अशा दिग्गज मंडळींसोबत काम करण्याची आणि रत्नागिरीतून जाऊन अध्यक्षपदी बसण्याची संधी मला मिळाली आहे. कोकणात सहकार क्षेत्र प्रगत नाही असे म्हटले जाते; पण या संधीमुळे महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात कोकणाचा आवाज दुमदुमतोय असे म्हणता येईल. या संधीचा उपयोग करून ही चळवळ अधिक विश्वासार्ह, अद्ययावत आणि कार्यक्षम करण्यासाठी मी नक्की प्रयत्न करीन,’ अशी ग्वाही पटवर्धन यांनी दिली.
‘सध्या फेडरेशनचे प्रशिक्षण केंद्र शिर्डीमध्ये आहे. ते अतिशय उत्तम चालते; पण महाराष्ट्राच्या सर्व प्रदेशांमध्ये प्रशिक्षण पोहोचवण्यासाठी एक मध्यवर्ती केंद्र आणि विभागवार उपकेंद्रे असावीत, अशी माझी संकल्पना आहे. कोकणामध्ये, विशेषतः रत्नागिरीत किंवा गणपतीपुळे येथे कायमस्वरूपी प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा माझा मानस आहे,’ असेही त्यांनी सांगितले.
‘सहकार कायद्याच्या ‘सेक्शन २४’मध्ये प्रशिक्षणाची आवश्यकता नमूद केलेली आहे. केवळ पतसंस्थाच नव्हे, तर दोन लाख सहकारी संस्थांमधील संचालक, कर्मचारी आणि सभासदांसाठी प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे. काही मोठ्या बँका आणि संस्थांना सोबत घेऊन रत्नागिरीत एक मोठे प्रशिक्षण केंद्र उभे राहावे,’ असा मनोदय त्यांनी बोलून दाखवला.
‘अंशदान या विषयावर सहकार खात्याने केलेल्या तरतुदींमध्ये अनेक त्रुटी आहेत. २०१७पासून यावर अनेक परिपत्रके निघाली आणि विरोधामुळे त्यांवर स्थगितीही आली. हा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा आणि सहकार चळवळीला पूरक यंत्रणा निर्माण व्हावी, यासाठी आम्ही शासनाकडे प्रकर्षाने मागणी करणार आहोत,’ असेही त्यांनी सांगितले.
‘पतसंस्था चळवळ अधिक विश्वासार्ह बनवण्यासाठी नियम पाळणे आणि संचालक मंडळाने डोळसपणे काम करणे गरजेचे आहे. रेकॉर्ड कीपिंग आणि डॉक्युमेंटेशनवरही विशेष लक्ष देण्याची गरज आहे. त्याकरिता संपूर्ण वर्षाचा एक अभ्यासपूर्ण सिलॅबस तयार करून तो महाराष्ट्रभर राबवण्याचा आमचा प्रयत्न राहील. पतसंस्था चळवळीमध्ये चांगले आणि चारित्र्यवान घटक स्थिरावावेत, हा यामागचाउद्देश आहे,’ असे ते म्हणाले.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

