Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

खुल्या प्रवर्गासाठीच्या योजनांची माहिती देण्यासाठी ‘अमृत’चा २१ ऑगस्टला रत्नागिरीत मेळावा

Advertisements

रत्नागिरी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेचा कोकण विभागातील पहिला अमृत मेळावा २१ ऑगस्ट रोजी रत्नागिरीत आयोजित करण्यात आला आहे. खासकरून खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल गटातील नागरिकांना स्वयंरोजगार, शैक्षणिक प्रगती आणि स्वावलंबन यासाठी उपयुक्त ठरेल या अनुषंगाने हा महामेळावा होणार आहे. रत्नागिरीतील टीआरपी येथील अंबर हॉलमध्ये सकाळी १० ते २ या वेळेत हा मेळावा होणार आहे. राज्याचे उद्योग, मराठी भाषा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असून, अध्यक्षस्थानी ‘अमृत’चे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी असतील. (योजनेच्या माहितीचा व्हिडिओ, संपर्क क्रमांक आणि कार्यक्रमपत्रिका बातमीच्या शेवटी दिली आहे.)

अमृत लक्ष्यित गटामध्ये ब्राह्मण, राजपुरोहित, बनिया, कम्मा, कायस्थ, अय्यंगार, नायर, नायडू, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, ठाकूर, त्यागी, सेनगूनथर, गुजराथी, जाट, सिंधी, कानबी, राजपूत, कोमटी, हिंदू मारवाडी आदींचा समावेश होतो. त्यांच्याकरिता स्वयंरोजगार, शिक्षणविषयक, आर्थिक लाभ, कर्ज व्याजपरतावा योजना, तसेच बेकरी, सोलर आणि इम्पोर्ट-एक्स्पोर्ट आदी प्रशिक्षणे, आयजीटीआर, सीआयपीईटी, एनआयईएलआयटी, सी- डॅक, एमकेसीएल आदी तांत्रिक व तंत्रज्ञानविषयक प्रशिक्षणे यांसह विविध योजनांची माहिती मेळाव्यात दिली जाणार आहे. आपली उत्पादने किंवा सेवा जगभरात बाजारपेठ मिळविण्यासाठी ‘अमृत पेठ’ योजनेचीही माहिती यात मिळेल. या योजनांमध्ये नोंदणी करण्यासाठी आणि योजनांचा लाभ घेण्यासाठी लक्ष्यित गटांतील नागरिकांनी अमृत मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन ‘अमृत’चे रत्नागिरी जिल्हा व्यवस्थापक महेश गर्दे यांनी केले आहे. मेळाव्यानंतर स्नेहभोजनही आयोजित करण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाठी जिल्हा व्यवस्थापक महेश गर्दे, विभागीय उपव्यवस्थापक अमित सामंत, जिल्हा उपव्यवस्थापक संतोष जुवळे, जिल्हा समन्वयक अवधूत मुळ्ये मेहनत घेत आहेत. कोकण विभागातील अमृत लक्ष्यित गटातील ब्राह्मण, मारवाडी, सिंधी, आर्य वैश्य, माहेश्वरी, कायस्थ, राजपुरोहित अशा विविध खुल्या प्रवर्गातील बांधवांनी या मेळाव्यास उपस्थित राहून योजनांचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी 9112228761 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महेश गर्दे यांनी केले आहे.

योजनेची अधिक माहिती देणारा व्हिडिओ पुढील लिंकवर https://www.facebook.com/share/v/1F35C2Wdxs

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version