छत्रपती शिवरायांना मानवंदना देणाऱ्या ‘अमृत दुर्गोत्सवा’चा विश्वविक्रम; रत्नागिरीकरांचाही सहभाग

रत्नागिरी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेने दिवाळीत आयोजित केलेल्या ‘अमृत दुर्गोत्सव’ उपक्रमाचा विश्वविक्रम नोंद झाला आहे. या उपक्रमात राज्याच्या विविध जिल्ह्यांप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातही दुर्गांच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या आणि त्याची सर्वांत जास्त छायाचित्रे पाठवण्यात आली. या अनोख्या उपक्रमातून महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना विश्वविक्रमी मानवंदना देण्यात आली. या उपक्रमासाठी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष असलेल्या आणि युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेल्या बारा दुर्गांपैकी कोणत्याही एकाची प्रतिकृती अंगणात, सोसायटीत, शाळेत, मैदानात तयार करून त्यासोबत फोटो घेऊन तो ‘अमृत दुर्गोत्सव’च्या वेबसाइटवर अपलोड करायचा होता. सहभागी झालेल्या प्रत्येकाला मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीचे अभिनंदन पत्र देण्यात आले.

‘मानवी हातांनी तयार केलेल्या प्रतिकृतींचा सर्वांत मोठा डिजिटल फोटो अल्बम’ या श्रेणीमध्ये ‘अमृत दुर्गोत्सवा’चा विश्वविक्रम झाल्याचे प्रमाणपत्र गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रतिनिधी श्री. पटेल यांनी अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांना सुपूर्द केले. ‘गिनीज’चे अधिकृत पंच श्री. पटेल यांनी विश्वविक्रमाची कठीण प्रक्रिया सर्वांपुढे मांडली. सुयोग्य चित्रे निवडणे, अस्पष्ट चित्रे बाद करणे अशा अनेक दिवस चाललेल्या अतिशय क्लिष्ट प्रक्रियेतून जाऊन विश्वविक्रम प्रस्थापित होऊ शकला याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. शिवप्रताप दिनाचे औचित्य साधून अमृत संस्थेच्या पुणे येथील मुख्यालयात एका कार्यक्रमात ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’चे अधिकृत प्रमाणपत्र विजय जोशी यांना सुपूर्द करण्यात आले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply