आज १४ नोव्हेंबर अर्थात जागतिक मधुमेह दिन. मधुमेह अर्थात डायबेटीस हा शब्द माहिती नाही, अशी व्यक्ती आजच्या घडीला सापडणार नाही. कारण मधुमेहाने सारे जगच व्यापून टाकले आहे आणि भारताला तर ‘मधुमेहाची राजधानी’ असा नकोसा किताब मिळालेला आहे. म्हणूनच मधुमेहाविषयी जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. कारण जीवनशैलीशी निगडित असलेल्या या समस्येशी दोन हात करण्यासाठी ती अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. मधुमेह दिनाचे औचित्य साधून त्या विषयावर ज्येष्ठ मधुमेहतज्ज्ञ डॉ. आशिष सरवटे यांनी लिहिलेल्या लेखमालेचा हा पहिला भाग… (दर शुक्रवारी ही लेखमाला प्रसिद्ध होईल.)
१४ नोव्हेंबर हा जागतिक मधुमेह दिन म्हणून साजरा केला जातो. १९२१ साली चार्ल्स बेस्ट आणि फ्रेड्रिक बँटिंग या दोन महान शास्त्रज्ञांनी इन्सुलिनचा शोध लावला. डॉ. बँटिंग यांच्या १४ नोव्हेंबर या जन्मदिनाचे औचित्य साधून हा दिवस जागतिक मधुमेह दिन म्हणून पाळला जातो. भारतात प्राचीन आयुर्वेदाचार्य चरक आणि सुश्रुत यांनी तीन हजार वर्षांपूर्वी मधुमेहाचा शोध लावला होता. ‘ज्या व्यक्तीच्या लघवीला मधासारखी गोड चव आहे, त्या व्यक्तीला मधुमेह झाला आहे,’ अशी व्याख्या त्यांनी केली होती. आधुनिक वैद्यकशास्त्र अर्थात मॉडर्न मेडिसीनप्रमाणे या विकाराला Diabetes Mellitus (डायबेटीस मेलिटस) असे म्हटले जाते.

२०२४च्या आकडेवारीनुसार, जगभरात २० ते ७९ या वयोगटातील ५.८९ कोटी व्यक्ती मधुमेही (डायबेटिक) आहेत. २०४५मध्ये त्यांची संख्या ७.९३ कोटी होईल, असा अंदाज व्यक्त केला जातो. भारताला मधुमेहाची राजधानी मानले जाते. कारण आजच्या घडीला भारतातील मधुमेही व्यक्तींची संख्या एक कोटीपेक्षा अधिक आहे. त्यापेक्षा महत्त्वाचा आकडा पुढेच आहे. १.३६ कोटी व्यक्ती प्रीडायबेटिक आहेत. म्हणजेच त्यांना मधुमेह झालेला नाहीये, पण त्या निरोगी नाहीत आणि मधुमेहाच्या उंबरठ्यावर आहेत. देशाच्या शहरी भागांमध्ये मधुमेहाचे प्रमाण अधिक असून, दर सात व्यक्तींमागे एका व्यक्तीला मधुमेह आहे. धक्कादायक आणि धोकादायक बाब म्हणजे एक तृतीयांश व्यक्तींना आपण मधुमेही आहोत याची कल्पनाच नाही. म्हणूनच मधुमेहाविषयी अधिकाधिक जागरूकता निर्माण होणे गरजेचे आहे. त्यामुळे ज्यांना मधुमेह झालेला आहे त्यांना तो नियंत्रणात ठेवता येईल. ज्यांना मधुमेह झालेला नाही, त्यांना तो होऊ नये म्हणून प्रयत्न करता येतील. अशा प्रकारे आपण सर्व जण मिळून या समस्येशी दोन हात करू शकू. ही जागरूकता निर्माण करण्यासाठीच या लेखमालेचे प्रयोजन केले आहे. छोट्या लेखांमधून आपण या विकाराविषयी जाणून घेणार आहोत.
मधुमेहाची लक्षणे (Symptoms of Diabetes)
आपल्याला मधुमेह झाला आहे का याचा सर्वसाधारण अंदाज बांधण्यासाठी काही सामान्य लक्षणे ठाऊक असणे आवश्यक आहे. कायम थकवा येणे, धूसर दिसणे, सतत भूक लागत राहणे, जास्त प्रमाणात तहान लागणे, लघवीला वारंवार होणे, वजन कमी होणे ही मधुमेहाची सामान्य लक्षणे आहेत. हातापायांची जळजळ होणे, क्षयरोग/फुप्फुस ज्वर आदी लक्षणांचाही यात समावेश होतो. अशी लक्षणे दिसत असल्यास योग्य निदान होण्यासाठी वैद्यकीय सल्ल्यानुसार ब्लड टेस्ट अर्थात रक्ताची चाचणी करून घेणे आवश्यक असते. (उर्वरित लेख जाहिरातीच्या खाली)

मधुमेहनिदानाच्या चाचणीचे प्रकार (Tests for diagnosis of Diabetes)
एचबी ए वन सी (HbA1C) : या चाचणीत संबंधित व्यक्तीच्या रक्तातील साखरेची (ब्लड ग्लुकोज) गेल्या दोन ते तीन महिन्यांतील सरासरी पातळी मोजली जाते. या चाचणीचा निकाल ६.५% किंवा त्यापेक्षा जास्त आल्यास संबंधित व्यक्तीला मधुमेह असल्याचे निदान होते. एचबीए वन सी चाचणीचा निकाल (टेस्ट रीडिंग) ५.७% ते ६.५% या टप्प्यात असेल, तर संबंधित व्यक्ती प्रीडायबेटिक अर्थात मधुमेहाच्या उंबरठ्यावर असते. टेस्ट रीडिंग ५.७%पेक्षा कमी असलेल्या व्यक्तीला मधुमेह नाही असे निदान होते. या टेस्टआधी काही प्यावे लागत नाही किंवा ही टेस्ट उपाशीपोटी करावी लागत नाही, हे या टेस्टचे वैशिष्ट्य आहे.
फास्टिंग प्लाझ्मा ग्लुकोज (FPG) : या टेस्टमध्ये संबंधित व्यक्तीच्या रक्तात उपाशीपोटी असलेली साखरेची पातळी अर्थात रक्तशर्करा (फास्टिंग ब्लड ग्लुकोज लेव्हल) मोजली जाते. या टेस्टआधी किमान आठ तास उपाशी राहणे बंधनकारक असते. म्हणूनच सर्वसाधारणपणे सकाळी लवकर, नाश्त्यापूर्वी ही टेस्ट केली जाते. फास्टिंग ब्लड ग्लुकोज लेव्हल १२६ एमजी/डीएल (मिलिग्रॅम्स पर डेसिलीटर) असल्यास डायबेटीस असल्याचे निदान होते. ही लेव्हल १०० ते १२६ एमजी/डीएल असल्यास संबंधित व्यक्ती प्रीडायबेटिक असते. उपाशीपोटी १०० एमजी/डीएल यापेक्षा कमी ब्लड ग्लुकोज लेव्हल असल्यास संबंधित व्यक्तीला डायबेटीस नाही असे निदान होते.
ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट (OGTT) : या टेस्टमध्ये संबंधित व्यक्तीला एक खास गोड पेय पिण्यासाठी दिले जाते. हे पेय पिण्यापूर्वी आणि ते प्यायल्यानंतर दोन तासांनी त्या व्यक्तीची रक्तशर्करा (ब्लड ग्लुकोज लेव्हल) मोजली जाते. त्यावरून त्या व्यक्तीचे शरीर साखरेवर कशा प्रकारे प्रक्रिया करते, साखरेला कसा प्रतिसाद देते हे लक्षात येते आणि त्यावरून निदान केले जाते. ते गोड पेय प्यायल्यानंतर दोन तासांनी मोजलेली रक्तशर्करा पातळी २०० एमजी/डीएल एवढी किंवा त्यापेक्षा जास्त असेल, तर संबंधित व्यक्तीला डायबेटीस झाल्याचे निदान होते. निरोगी व्यक्तींमध्ये हे रीडिंग १४० एमजी/डीएल एवढे येते, तर १४० ते २०० एमजी/डीएलपर्यंतचे रीडिंग असलेल्या व्यक्ती प्रीडायबेटिक असतात. (अधिक माहिती जाणून घेऊ या लेखमालेच्या पुढील भागात…)

– डॉ. आशिष सरवटे, ठाणे येथील डायबेटॉलॉजिस्ट
(१६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता रत्नागिरीत स्वयंवर मंगल कार्यालयात डॉ. आशिष सरवटे यांचे व्याख्यान आयोजित केले आहे.)


