रत्नागिरी : ‘खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनी आपल्या पायावर उभे राहावे, त्यांच्यातूनही उद्योजक घडावेत आणि आजवर उपेक्षित राहिलेल्या या समाजघटकाची सर्वांगीण प्रगती व्हावी, यासाठी ‘अमृत’ ही संस्था सर्वतोपरी मदत करत आहे. ‘अमृतपेठ’ हे ई-कॉमर्स पोर्टल म्हणजे त्यातील एक क्रांतिकारी पाऊल असून, त्याद्वारे संबंधित गटातील अगदी लहानातील लहान उद्योजकालाही आपली दर्जेदार उत्पादने आणि सेवा कोणत्याही कमिशनविना सर्वत्र विकता येणार आहेत. म्हणूनच संस्थेच्या सर्वच योजनांचा जास्तीत जास्त जणांनी लाभ घ्यावा,’ असे आवाहन ‘अमृत’ या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी रत्नागिरीत केले. महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असून, कोकण विभागातील पहिला अमृत मेळावा आज, २१ ऑगस्ट रोजी रत्नागिरीत आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला चांगला प्रतिसाद लाभला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे.
खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल गटातील नागरिकांना स्वयंरोजगार, शैक्षणिक प्रगती आणि स्वावलंबन यासाठी उपयुक्त योजनांची माहिती या मेळाव्यात देण्यात आली. शासनाच्या इतर कोणत्याही प्रकारच्या योजनांचा लाभ मिळत नसलेल्या नागरिकांना योजनांचा लाभ घेता येतो. अमृत लक्ष्यित गटामध्ये ब्राह्मण, राजपुरोहित, बनिया, कम्मा, कायस्थ, अय्यंगार, नायर, नायडू, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, ठाकूर, त्यागी, सेनगूनथर, गुजराथी, जाट, सिंधी, कानबी, राजपूत, कोमटी, हिंदू मारवाडी, हिंदू नेपाळी आदींचा समावेश होतो. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असल्याचा दाखला, अधिवास दाखला अर्थात डोमिसाइल सर्टिफिकेट, आधार, पॅन आणि शाळा सोडल्याचा दाखला एवढ्याच कागदपत्रांच्या आधारे या योजनांचा लाभ घेता येऊ शकतो. नवउद्योग अर्थात स्टार्टअप्स उभारण्यासाठी आणि ज्यांचे आधीपासूनच उद्योग आहेत त्यांनी बँकेकडून कर्ज घेतल्यास त्यांना व्याजपरतावा देण्याची एक योजना आहे. स्वयंरोजगार, शिक्षणविषयक, बेकरी, सोलर आणि इम्पोर्ट-एक्स्पोर्ट आदी प्रशिक्षणे, आयजीटीआर, सीआयपीईटी, एनआयईएलआयटी, सी- डॅक, एमकेसीएल आदी संस्थांची तांत्रिक व तंत्रज्ञानविषयक प्रशिक्षणेही या अंतर्गत घेता येणार आहेत. विजय जोशी यांनी या वेळी संस्थेची स्थापना, उद्देश आणि कार्य याबद्दल विस्ताराने माहिती दिली. तसेच, भविष्यातील योजनांविषयीही सांगितले. उपस्थितांच्या प्रश्नांना नेमकी उत्तरे देऊन त्यांनी शंकानिरसन केले. तसेच, ‘तुम्ही धडपड करा, उभे राहा, आम्ही बरोबर आहोतच,’ असा विश्वास श्री. जोशी यांनी सर्वांना दिला. १२ हजारांवर लघुउद्योजक निर्माण करून शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाला हातभार लावण्याचा ‘अमृत’चा मानस असल्याचे सांगतानाच जास्तीत जास्त लोकांपर्यंत या योजना पोहोचवून लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. यात महिलांची संख्या मोठी असल्यास अधिक आनंद होईल, असे त्यांनी सांगितले. अमृत मित्र, अमृत सखी यांच्यामुळे संस्थेचे काम सर्वदूर पोहोचायला मदत होत असल्याचे त्यांनी नमूद केले. (उर्वरित बातमी जाहिरातीच्या खाली)
कार्यबाहुल्यामुळे उद्योगमंत्री आणि पालकमंत्री डॉ. उदय सामंत या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत; मात्र त्यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छासंदेश पाठवला आणि यासाठी कागदपत्रे मिळवण्यात काही अडचणी येत असल्यास त्या दूर करून योजनेचा लाभ जास्तीत जास्त गरजूंना घेता येईल, या दृष्टीने सकारात्मक प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
अर्थमूव्हिंगच्या उद्योगासाठी ३१ लाख रुपयांचे कर्ज घेतले असून, अमृत योजनेमुळे त्यापैकी १५ लाख रुपयांच्या कर्जाच्या व्याजाचा परतावा मिळाल्याचा अनुभव लांज्यातील तरुण उद्योजक आणि यू-ट्यूबर अथर्व हर्डीकर या लाभार्थ्याने सांगितला. देवरूखमध्ये कम्प्युटर इन्स्टिट्यूट चालवणारे श्री. पित्रे यांनी विद्यार्थ्यांना ‘अमृत’ योजनेचा कसा लाभ देता आला याबद्दल सांगितले. या मेळाव्याला कऱ्हाडे ब्राह्मण संघ, चित्पावन ब्राह्मण संघ, कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण संघ, देवरुखे ब्राह्मण संघ, पाटीदार समाज, मरूधर समाज, सारस्वत समाज आदींचे प्रतिनिधी जिल्हाभरातून मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘एमकेसीएल’चे जिल्हा प्रतिनिधी संतोष कोलते, ‘एमसीईडी’चे कोकण विभाग समन्वयक श्री. थावरे उपस्थित होते आणि योजनांचा उपयोग कसा करून घेता येईल, याबद्दल त्यांनीही माहिती दिली.
‘अमृत’चे विभागीय उपव्यवस्थापक अमित सामंत यांनी प्रास्ताविकात योजनांची तोंडओळख करून दिली. जिल्हा व्यवस्थापक महेश गर्दे यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा समन्वयक अवधूत मुळ्ये यांनी आभारप्रदर्शन केले. जिल्हा उपव्यवस्थापक संतोष जुवळेदेखील या वेळी उपस्थित होते.
अधिक माहितीसाठी :
अमृत संस्थेच्या रत्नागिरी जिल्हा कार्यालयाचा पत्ता :
हॉटेल सिंधुदुर्गसमोर, माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या मागे
साळवी स्टॉप-नाचणे लिंक रोड, रत्नागिरी
संपर्क : 9112228761
अमृत संस्थेचे संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
‘अमृतपेठ’वर विक्रेत्यांच्या नोंदणीसाठी : https://amrutpeth.com/ (नोंदणीपूर्वी वरील क्रमांकावर संपर्क साधावा.)
योजनेची अधिक माहिती देणारा व्हिडिओ पुढील लिंकवर https://www.facebook.com/share/v/1F35C2Wdxs

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

