एक अत्यंत संस्मरणीय आणि आदर्श स्मृतिसोहळा अनुभवण्याची संधी मिळाली. प्रथितयश लेखक जयवंत दळवी यांची स्मृतिशताब्दी गेल्या वर्षी १४ ऑगस्ट रोजी सुरू झाली. या वर्षी त्याचा समारोप झाला. त्यांच्या आठवणी जपणारा कार्यक्रम त्यांचे मूळ गाव असलेल्या आरवली आणि परिसरात वर्षभर साजरा करण्यात आला. एखाद्या व्यक्तीची आठवण त्याच्या शंभराव्या वर्षात वर्षभर जपणारा असा एखादा कार्यक्रम अनोखाच आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी आणि वेंगुर्ले या दोन तालुक्यांमधील आरवलीच्या परिसरातील त्यांच्या चाहत्यांनी वर्षभर दळवींच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. त्यांच्या प्रचंड साहित्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. साहित्य प्रेरणा कट्टा ही आभासी संस्था आणि शिरोडा येथील रघुनाथ गणेश खटखटे या शतकमहोत्सवी ग्रंथालयाने हा उपक्रम राबविला. साहित्य रसिक आणि हे साहित्य जतन करणारी, रसिकांना ते पुरविणारी ग्रंथालयासारखी संस्था विधायक हेतूने एकत्र आली की किती उत्तम आदर्श निर्माण होऊ शकतो, हेच या संस्थांनी दाखवून दिले आहे.
दळवींची जन्मशताब्दी गेल्या वर्षी सुरू झाली. कविता वगळता कथा, कादंबरी, नाटक अशा साहित्यात लीलया संचार करून ज्यांनी उत्तम कामगिरी केली, तो लेखक आपल्या मातीतला, आपल्या परिसरातला आहे, त्याने तयार केलेला साहित्याचा ठेवा आपण अनुभवला पाहिजे, पुढच्या पिढीपर्यंत तो प्रवाहित केला पाहिजे आणि त्याद्वारे तो जोपासला पाहिजे, या प्रेरणेतून साहित्याचा हा जागर वर्षभर करण्यात आला. साहित्य प्रेरणा कट्टा ही आभासी संस्था म्हटली याचे कारण असे की, या नावाने साहित्यप्रेमी एकत्र झाले. पण त्याची अधिकृत नोंदणी झालेली नाही. संस्थेला अध्यक्ष आणि कार्यकारिणीही नाही. फक्त कार्यकारणभावातून साहित्यप्रेमी मंडळी एकत्र आली आणि त्यांनी वाचनाची चळवळ वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या चळवळीला ग्रंथालयाची साथ मिळाली. लेखक असतील तर साहित्य असते, साहित्य असेल तर वाचक असतात आणि त्या दोघांमधील दुवा म्हणून ग्रंथालय काम करते. अलीकडे वाचनाचे प्रमाण कमी झाले आहे, अशी सार्थ तक्रार केली जाते. पण असलेल्या साहित्याची रुची वाढविण्यासाठी, वाचकांपर्यंत साहित्य नेण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत. काळानुरूप अनेक बदल घडत असतात. सोशल मीडियाच्या जमान्यात होणारे बदल सर्वांनीच स्वीकारून पुढे जायला हवे. ग्रंथालयांनी वाचकांच्या पाठ फिरविण्याकडे बोटे न दाखविता आपले विहित कार्य पुढे नेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. हेच प्रयत्न खटखट ग्रंथालयाने आणि या ग्रंथालयाच्या संपर्कात आलेल्या साहित्य प्रेरणा कट्टा या साहित्य रसिकांच्या संस्थेने केले आहे. दळवींच्या जन्मशताब्दी सांगता सोहळ्याच्या निमित्ताने हे सारे बंध आरवली येथे दळवी यांच्या मूळ गावी झालेल्या सांगता सोहळ्याच्या निमित्ताने आणखी ठळक झाले. नेमके कार्यक्रम, भाषणबाजीला फाटा, स्वागतासाठी फुलांच्या ऐवजी पुस्तके, नेटकेपणा आणि वेळ पाळली गेल्यामुळे दळवींच्या जन्मशताब्दीचा सांगता सोहळा अत्यंत संस्मरणीय ठरला.
कोकण मराठी साहित्य परिषद म्हणजे कोकणातील साहित्य चळवळ पुढे नेण्यासाठी साहित्यिक आणि रसिकांनी मोठ्या उमेदीने सुरू केलेली साहित्य संस्था आहे. या संस्थेच्या रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीची अलीकडेच निवड झाली. निवृत्त शिक्षक आनंद शेलार यांची जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड झाली. परिषदेचे कार्य जगभरात नेण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जयवंत दळवी जन्मशताब्दीनिमित्ताने झालेल्या कार्यक्रमांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवायला हवा. तो ठेवून कार्य केले तर असे कार्यक्रम आजच्या युगात जगभर पसरायला वेळ लागणार नाही. त्यासाठी आणखी वेगळे काही प्रयत्न करण्याची गरज नाही.
- प्रमोद कोनकर
(संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, २२ ऑगस्ट २०२५)
(साप्ताहिक कोकण मीडियाचे अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

