रत्नागिरी : येत्या १४ सप्टेंबरपासून कोकणात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव सुरू होणार आहे. त्याकरिता रत्नागिरी शहरातील सर्व रस्ते त्या दिवसापर्यंत खड्डेमुक्त होतील, अशी ग्वाही नगराध्यक्षा सौ. शिल्पा सुर्वे यांनी दिली.
याबाबत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्या म्हणाल्या, गणरायाच्या आगमनासाठी रत्नागिरी पालिका सज्ज झाली असून गणेशोत्सवासाठी आवश्यक असलेली सर्व तयारी करण्यात आली आहे. शहरातील जवळपास ६० टक्के खड्डे बुजवण्याचे काम झाले आहे. उर्वरित सगळ्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात येणार असून रत्नागिरी शहर खड्डेमुक्त करण्यात येणार आहेत. भटक्या कुत्र्यांच्या बाबतीत त्यांच्या निर्बीजीकरणासाठी निविदा काढण्यात आली असून त्याबाबतदेखील लवकरात लवकर उपाययोजना करण्यात येणार आहेत. मोकाट गुरांचा संदर्भात काही संस्थांशी बोलणी सुरू असून गोशाळेत या सर्व मोकाट गुरांना देण्यात येणार असून त्याबाबतीतदेखील सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत, असेही त्या म्हणाल्या.
शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे. फुटपाथवर फळविक्रेते बसलेले असतात. त्यांच्यासाठी पालिकेच्या हद्दीत साळवी स्टॉप परिसरातील मैदान, मंगळावर बाजार मैदान, लक्ष्मी चौक मैदान आठवडा बाजार आदी ठिकाणी त्यांनी आपले स्टॉल टाकावेत. फुटपाथवर स्टॉल टाकण्यात येऊ नयेत. लोकांनीदेखील फुटपाथवर रस्त्यावर गाड्या लावून अशा फळविक्रेत्यांकडे फळे खरेदी करू नयेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ शकते. जी मैदाने दिली आहेत तेथे या सगळ्या फळविक्रेत्यांनी आपला व्यवसाय करायचा आहे, असे नगराध्यक्षांनी बजावले.
त्या म्हणाल्या, शहरातील स्थानिक टपरी व्यावसायिकांसाठी चांगल्या दर्जाचे स्टॉल देण्यात येणार आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सगळ्या भागातील स्ट्रीटलाइट सुस्थितीत आहेत की नाही, ते तपासले जात आहे. जेथे लाइटची व्यवस्था नाही, तेथे ती सोय करण्यासाठी विद्युत विभागातील सगळे कर्मचारी रात्रंदिवस मेहनत करत आहेत. सगळे सार्वजनिक रस्ते, गल्ली, बोळ, समुद्रकिनारे आदी भागातील स्वच्छता करण्यात येत आहे. कुठेही रस्त्यावर कचरा दिसणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे.
गणपती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव निर्माण केला जाणार आहे. तसेच मांडवी समुद्रकिनाऱ्याव निर्माल्य संकलन कलश उभा केला जाणार आहे.
रत्नागिरीतील शहरातील नागरिकांना तसेच मुंबईवरून येणाऱ्या सर्व चाकरमान्यांना रत्नागिरी पालिकेच्या वतीने नगराध्यक्षांनी शुभेच्छा दिल्या.
पत्रकार परिषदेला उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, आरोग्य सभापती राकेश नागवेकर, बांधकाम सभापती बंटी कीर, नगरसेवक राजेश तोडणकर, अमित विलणकर, सुहेल साखरकर, सौ. प्रीती सुर्वे, दत्तात्रय (बाळू) साळवी आदी मान्यवर उपस्थित होते.
Follow Kokan Media on Social Media
