रत्नागिरी शहर भाजपतर्फे खड्ड्यांत वृक्षारोपण करून आंदोलन

रत्नागिरी : ‘नगराध्यक्ष, रस्त्यावरील खड्डे कधी भरणार?’ असा सवाल विचारत रत्नागिरी शहर भाजपच्या वतीने आज (२९ ऑक्टोबर) आठवडा बाजार परिसर, गांधी कॉलनी येथील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. भाजपच्या या अनोख्या आंदोलनाची शहरात चर्चा होती. शहरातील अनेक रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. या पार्श्वभूमीवर, भाजपने नगरपालिका प्रशासनाचा जाहीर निषेध केला. ‘रस्त्यावरील खड्डे भरा, नाही तर खुर्च्या खाली करा, आठ दिवसांत सर्व रस्ते चकाचक करा, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू,’ असा इशारा भाजपचे शहराध्यक्ष सचिन करमरकर यांनी दिला.

‘गेली काही वर्षे शहरातील रस्त्यांबाबत नागरिकांकडून तक्रारी येत आहेत. एकदा केलेल्या कामानंतर रस्त्यांवर पुन्हा डांबर टाकावे लागते, एकदा केलेला रस्ता किती वर्षे टिकला पाहिजे याबाबतही नियम, निकष आहेत. परंतु सत्ताधाऱ्यांकडून रस्त्यांच्या कामाकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. आता तरी नगराध्यक्षांनी यात लक्ष घालून रस्ते चकाचक करावेत. ज्यांनी नगराध्यक्ष व सत्ताधाऱ्यांना निवडून दिले, त्या जनतेची कामे करावीत,’ असा टोला भाजयुमो जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी लगावला. पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना समस्यांबाबत पत्र पाठवले, तरीही त्यांच्याकडून उत्तर दिले जात नाही, जनतेच्या रोषाला कारणीभूत होऊ नका, असा असेही पटवर्धन म्हणाले. केंद्र सरकारकडून रत्नागिरी नगरपालिकेला स्वच्छतेचे पारितोषिक मिळाले. परंतु शहरातील समस्या कायम आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शहर भाजपच्या वतीने आज (२९ ऑक्टोबर) सकाळी आठवडा बाजार येथील गांधी कॉलनीच्या रस्त्यावर वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर माळनाका येथील खराब झालेल्या रस्त्यावर सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या वेळी विनय उर्फ भैया मलुष्टे, संदीप सुर्वे, नगरसेवक राजेश तोडणकर, राजन पटवर्धन, राजश्री शिवलकर, नगरसेविका सौ. सुप्रिया रसाळ, राजन फाळके, संदीप रसाळ, भाजयुमो शहराध्यक्ष विक्रम जैन, माजी शहराध्यक्ष प्रशांत डिंगणकर, राजू भाटलेकर, नंदू चव्हाण, हर्ष दुडे, अशोक वाडेकर, प्राजक्ता रुमडे, रामा शेलटकर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष ऐश्वर्या जठार, पमू पाटील, अमन काझी, बबलू शर्मा, वेदिका गवाणकर आदी उपस्थित होते.

रत्नागिरी शहराच्या अनेक प्रभागांमध्ये अस्वच्छता दिसते. तसेच ठरावीक प्रभागांतच कामे केली जातात. शहरातील बहुतांश रस्ते खड्डेमय, गाडी चालवण्याच्या लायकीचे राहिलेले नाहीत. त्यामुळे त्वरित खड्डे भरून डांबरीकरण करावे, अशी मागणी भाजपच्या वतीने या वेळी करण्यात आली.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply