रत्नागिरी : रत्नागिरी पालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या कल्पक धोरणाअभावी शहरातील पालिका शाळांची दुर्दशा झाली आहे. ती सुधारण्याच्या दृष्टीने योजना तयार करण्याकरिता दक्षिण रत्नागिरी जिल्हा भाजपने एक विशेष समिती स्थापन केली असून एका महिन्यात ही समिती आपला अहवाल देईल, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी दिली.
ते म्हणाले, करोनाच्या मोठ्या कालावधीनंतर शाळा सुरू झाल्या आहेत. काल या शाळांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली, त्यावेळी शाळांमधील चैतन्यहीन स्थिती अनुभवास आली. भाजपचे शहर अध्यक्ष सचिन करमरकर, बाबू सुर्वे, नितीन जाधव, सौ. रसाळ, सौ. करमरकर, सौ. रायकर, राजू तोडणकर या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांसह काल मराठी शाळांना भेटी दिल्या. त्यानंतर या स्थितीत सुधारणा व्हावी, यासाठी सौ. सुमिता भावे, सौ. दाक्षायणी बोपर्डीकर, प्रमोद खेडेकर, मनोज पाटणकर, योगेश हळदवणेकर आणि नगरसेवक यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. रत्नागिरीतील नगरपालिकांच्या शाळांचे भवितव्य लक्षात घेऊन त्याबाबतची माहिती घेऊन एक धोरण तयार करण्याचे काम या समितीकडे सोपवण्यात आले असून एक महिन्यात त्यांनी याबाबत धोरण पार्टीकडे सादर करावे, यासाठी शहर अध्यक्ष श्री. करमरकर प्रयत्नशील आहेत, असे श्री. पटवर्धन म्हणाले.
ते पुढे म्हणाले, रत्नागिरी पालिकेच्या २२ शाळा सुरू होत्या. त्यापैकी ४ शाळा बंद पडल्या. आज ८९ शिक्षक १९०० च्या आसपास विद्यार्थी आणि १८ शाळा अशी स्थिती कागदावर दिसते. या १८ शाळांपैकी अनेक शाळांची पटसंख्या केवळ ७ ते २० एवढीच आहे. लोकमान्य टिळकांचे नाव असलेली आणि ते ज्या शाळेतशिकले अशा शाळा क्र.२ ची इमारत पाडून अनेक महिने झाले. मात्र ही इमारत पुन्हा बांधण्याबाबत पालिका मूग गिळून आहे. टिळकांच्या नावाशी जोडलेली ही शाळा आज विस्थापित आहे. रत्नागिरीतील सुज्ञ जनतेने चाललेली ही सरस्वतीची अवहेलना निमूट पाहणे रत्नागिरीच्या संस्कृतीला गौरवास्पद नाही. अधिकार असणारी यंत्रणा या शाळेकडे कोणत्या दृष्टीने पाहते, याची कल्पना नागरिकांना आली आहे. हे विद्यालय परत उभ राहावे, यासाठी जनचळवळ उभी करावी लागणार आहे. त्याकरिता नागरिकांनी उत्स्फूर्तपणे पुढे यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
ते म्हणाले, शाळा क्र.१ चा पट जेमतेम १४ असून शाळेत स्वच्छतालय पुरेशी नाहीत. सेप्टिक टॅंक पूर्ण उघडा, प्रवेशद्वाराजवळ दगडधोंड्यांचा ढीग अशा अवस्थेत मुले या मराठी शाळांमध्ये कशासाठी येतील? शाळा क्र.५ स्वातंत्र्यवीर सावरकर विद्यालयाच्या प्रवेशद्वाराचा शाळेचा फलक पूर्ण गंजलेला आहे. ज्या शाळेवर फलकच नेटका ना,ही त्या शाळेची अवस्था केवळ ८ मुलांचा पट एवढीच राहिली आहे. बहुतांश वर्गखोल्या कुलूपबंद आहेत. शाळेत २ शिक्षक आहेत. पूर्वी पहिली ते सातवीचे वर्ग असणारी ही शाळा आता चौथीपर्यंतच आहे. इमारतीचे छप्पर धोकादायक आहे. शाळेच्या परिसरात सरपटणारे साप अनेकवेळा समोर दिसतात, अशी शाळेची अवस्था पाहून मन उद्विग्न झाले.
शहरातील पालिकेच्या ४ शाळा बंद होतात, अनेक शाळांमध्ये १० विद्यार्थीसुद्धा नाहीत. सुविधांची वानवा, शैक्षणिक वातावरण, उत्साहवर्धक वातावरणाचा अभाव, मराठी शाळांकडे कल कमी का, याबाबत विचार करण्यासाठी यंत्रणा सक्षम नाही. ज्यांच्या हातात ही व्यवस्था आहे, ते अन्य विषयांना प्राधान्य देतात. एका बाजूला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी हलकल्लोळ होत असताना सुविद्य, सुसंस्कृत रत्नागिरीतील मराठी शाळा, सरस्वतीची मंदिरे ओस पडली आहेत. त्यांची दैन्यावस्था झाली आहे. मराठी शाळांबाबत कोणतेही ठोस धोरण नाही. कोणताही कल्पक कार्यक्रम नाही. केवळ शिक्षक नेमून वर्गखोल्यांचे कोंडवाडे अशी स्थिती झाली आहे. शैक्षणिक चळवळीला महत्त्व देणारी व्यवस्था नाही. रस्ते खड्ड्यात गेलेले आहेत. त्याबरोबर शाळाही खड्ड्यात जात चाललेल्या आहेत.
रत्नागिरीतील मराठी शाळांचा हाच प्रश्न घेऊन तो धसास लावण्यासाठी प्रत्येक पातळीवर प्रयत्न केले जाणार आहेत. शाळा क्र. २ ची पुनर्बांधणी झालीच पाहिजे, यासाठी आग्रही राहणार आहोत. समितीच्या अहवालानंतर पुढची दिशा ठरविली जाईल, असे श्री. पटवर्धन यांनी सांगितले.
