महाराष्ट्रात ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला कल्याण-डोंबिवलीत; लक्षणे सौम्य

मुंबई : दक्षिण आफ्रिकेतील केपटाउन शहरामधून दुबई आणि दिल्लीमार्गे २४ नोव्हेंबरला मुंबईमध्ये आलेल्या ३३ वर्षीय व्यक्तीला करोनाच्या ओमिक्रॉन या व्हॅरिएंटचा संसर्ग झाल्याचे प्रयोगशाळा तपासणीतून सिद्ध झाले आहे. विषाणूच्या या नवीन प्रकाराचा राज्यातील हा पहिला रुग्ण आहे.

हा तरुण कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असून, त्याने कोणतीही कोविड प्रतिबंधक लस घेतलेली नाही. २४ नोव्हेंबर २०२१ रोजी या व्यक्तीला सौम्य ताप आला. तथापि इतर कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. त्यामुळे या रुग्णाचा आजार सौम्य स्वरूपाचा असून, तो सध्या कल्याण-डोंबिवली येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहे.

या रुग्णाच्या खूप जवळून संपर्कात आलेल्या १२ आणि संपर्कात आलेल्या अन्य २३ जणांचा शोध घेण्यात आला असून, ते सर्व जण कोविड निगेटिव्ह आढळले आहेत. याशिवाय या तरुणाने दिल्ली ते मुंबई हा प्रवास ज्या विमानाने केला, त्या विमान प्रवासातील २५ सहप्रवाशांचीदेखील तपासणी करण्यात आली असून, तेही सर्व जण कोविड निगेटिव्ह आढळले आहेत. या शिवाय त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या आणखी व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे.

दरम्यान, झांबिया देशातून पुण्यात आलेल्या ६० वर्षीय पुरुष रुग्णाच्या जनुकीय तपासणीचा अहवालही राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडून प्राप्त झाला असून, त्या रुग्णाला ओमिक्रॉनचा संसर्ग झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या रुग्णाला करोनाच्या डेल्टा व्हॅरिएंटच्या उपप्रकाराची लागण झाल्याचे स्पष्ट जाले आहे. दोन दिवसांपूर्वीच शेजारच्या कर्नाटक राज्यात ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आढळले होते. तसेच, गुजरातमध्येही ओमिक्रॉनचा एक रुग्ण आढळला होता. त्यामुळे देशातील ओमिक्रॉनबाधितांची एकूण संख्या आता चार झाली आहे.

संसर्गाचा जास्त धोका असलेल्या देशांतून आज सकाळपर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या सर्व ३८३९ प्रवाशांची आरटी-पीसीआर तपासणी करण्यात आली असून, इतर देशांमधून आलेल्या १७,१०७ प्रवाशांपैकी ३४४ प्रवाशांची आरटी-पीसीआर तपासणी करण्यात आली आहे.

मुंबई विमानतळावरच्या तपासणीत एक डिसेंबरपासून आतापर्यंत आठ प्रवासी करोनाबाधित आढळले असून, त्यांचे नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. याशिवाय राज्यात १ नोव्हेंबरपासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचेदेखील क्षेत्रीय पातळीवर सर्वेक्षण सुरू आहे.

विषाणूमध्ये बदल होणे, त्याचे नवे व्हॅरिएंट्स तयार होणे, ही नैसर्गिक प्रक्रिया असून, याबाबत जनतेने भीती न बाळगता आपल्या नेहमीच्या व्यवहारात करोनाविषयक वर्तन पाळावे, आपले लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करावे, तसेच मागील महिनाभरात जे प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करून भारतात आले आहेत, त्यांनी आपली माहिती स्थानिक आरोग्य विभागाला द्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने सर्व नागरिकांना करण्यात आले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply